हर घर तिरंगा अभियान अंतर्गत कर्जतमध्ये भव्य तिरंगा रॅली. सर्व प्रशासकीय विभाग आणि शैक्षणिक संस्थेचा उत्स्फूर्त सहभाग

कर्जत (प्रतिनिधी) :
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित कर्जतमधील सर्व प्रशासकीय विभाग आणि शहरातील शैक्षणिक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी भव्य तिरंगा रॅली प्रभात फेरीचे आयोजन केले होते. सदर तिरंगा रॅलीची सुरुवात कर्जत पोलीस ठाण्यातून करण्यात आली होती. यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी- कर्मचारी, शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य, शिक्षक आणि विक्रमी संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
कर्जत तालुका प्रशासन आणि सर्व शैक्षणिक संस्थानी शनिवार, दि १३ रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित तिरंगा प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी होत त्यांच्या हाती अभिमानाचा भारतीय तिरंगा आणि मुखी “भारतमाता की जय, वंदे मातरम आणि जय जवान-जय किसान” या घोषनानी कर्जत शहर देशप्रेमात न्हाऊन निघाला. यामध्ये विद्यार्थ्यांच्या झांज-लेझीम पथकाने उपस्थित नागरिकांची वाहवा मिळवली. प्रभात फेरी अंतिम टप्प्यात आली असता पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वाराला प्रशासकीय अधिकारी- नगरसेवकांनी विद्यार्थ्यांचे जोरदार टाळया वाजवत स्वागत केले.
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निम्मित आज सर्वांच्या सहकार्याने भव्य अशी तिरंगा रॅली संपन्न झाली याचा आपणाला आणि सर्व प्रशासनाला अभिमान आहे. आजच्या विद्यार्थ्यांचे भाग्य आहे की त्यांच्या विद्यार्थी दशेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. प्रत्येकाने पुढील तीन दिवस आपल्या घरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकार यांनी आवाहन केलेल्या “हर घर तिरंगा” अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. तसेच या काळात भारतीय तिरंगाचे पावित्र्य जपावे असे आवाहन केले. या तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यानी विक्रमी सहभाग नोंदविला त्या सर्वांचे प्रशासन प्रमुख म्हणून डॉ थोरबोले यांनी आभार मानले.
यावेळी नगराध्यक्षा उषा राऊत यांनी कर्जत शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा. आणि त्याचे पावित्र्य अबाधित राखावे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी कर्जत पोलीस ठाण्यात तिरंगा फडकवत राष्ट्रगीताने रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपनगराध्यक्षा रोहिणी घुले, यांच्यासह आजी-माजी सैनिक, सर्व नगरसेवक-नगरसेविका, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, शहरातील पत्रकार, दादा पाटील महाविद्यालयाचे एनसीसी विभाग, सर्व शैक्षणिक संस्थेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, सर्व सामाजिक संघटनेचे श्रमप्रेमी आदी हाती तिरंगा घेत उपस्थित होते.