राजकिय

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा, स्वातंत्रदिनी नगरमध्ये समारोप

नगर ८ ऑगस्ट २०२२( प्रतिनिधी): देशाच्या स्वातंत्र्याची ७५ वी साजरी होत आहे. काँग्रेस या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. नगर जिल्ह्यामध्ये माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची आजादी गौरव पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. ९ ते १४ ऑगस्ट दरम्यान ही पदयात्रा जिल्ह्याच्या सर्व तालुक्यांमध्ये आयोजित करण्यात आली आहे. नगर शहरामध्ये प्रभागांमध्ये नागरिकांच्या भेटीगाठी घेत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्टला स्वातंत्रदिनी आ.थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगर शहरात या पदयात्रेचा समारोप होणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ.मोहनदादा जोशी व जिल्हा निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र किराड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे, जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, नगरसेवक आसिफ सुलतान, प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, माजी नगरसेविका जरीना पठाण, ब्लॉक काँग्रेसचे हनिफ मोहम्मद शेख, निलेशदादा चक्रनारायण, विनोद गायकवाड, अरुण वाघमोडे, ब्लॉक काँग्रेसचे सागर इरमल, रवी शिंदे, रजिया शेख, सरकुंजा शेख, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, शिल्पा दिसुंगे आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राजस्थानच्या उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरातून दिलेल्या कार्यक्रमानुसार सबंध महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पदयात्रांचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यातील प्रत्येक तालुक्यात १५ ते १७ किमीची पदयात्रा काढण्यात येणार आहे. श्रीगोंदा तालुक्यात काष्टी ते श्रीगोंदा, कर्जत तालुक्यात पाटेगाव ते टाकळी खंडेश्वरी, नगर तालुक्यात टाकळी काजी ते आठवड, पारनेर तालुक्यात वडनेर ते गुणवरे, पाथर्डी तालुक्यात करंजी ते मिरी, शेवगाव तालुक्यात अमरापुर ते शेवगाव, राहुरी तालुक्यात केंद्ळ ते वरुड, श्रीरामपूर तालुक्यात श्रीरामपूर ते टाकळीभान, राहता तालुक्यात शिर्डी ते अस्तगाव अशा पद्धतीने पदयात्रांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर अकोले, संगमनेर, कोपरगाव, नेवासासह सर्व तालुक्यांमध्ये पदयात्रांचे जोरदार नियोजन करण्यात आले आहे.
यामध्ये तालुका काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, तसेच फ्रंटल अध्यक्ष, बूथ कमिटीचे अध्यक्ष, कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. सकाळी साडेआठ वाजता प्रत्येक गावातील पदयात्रा सुरू होणार असून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या घरावर तिरंगा झेंडा फडकवण्यात येऊन सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच रस्त्यात येणाऱ्या प्रत्येक गावांमध्ये कॉर्नर सभांच आयोजन करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ७५ वर्षे तालुक्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला अशा काँग्रेस संघटनेतील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा सन्मान करण्याची भूमिका या पदयात्रेच्या माध्यमातून घेण्यात आली आहे.
संध्याकाळी शेवटच्या गावात पदयात्रेची मोठी मिरवणूक निघणार असून ती गावातील सगळ्या प्रमुख रस्त्याने जाणार असून मुख्य चौकात जाहीर सभेच्या माध्यमातून सांगता होणार आहे. सर्व पदयात्रांमध्ये पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात, आ.लहू कानडे, आ.डॉ.सुधीर तांबे, प्रदेश काँग्रेसचे माजी युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व राज्य पातळीवरील प्रमुख नेते या जाहीर सभांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
नगर शहरामध्ये १७ प्रभाग आहेत. दररोज दोन ते तीन प्रभागांमध्ये पदयात्रा काढत पदाधिकारी,कार्यकर्ते नागरिकांच्या भेटी घेणार आहेत. दररोज संवाद कार्यक्रमाने पदयात्रेची सांगता होणार आहे. सप्ताहामध्ये शहरात सुमारे ७५ किमीची पदयात्रा पूर्ण केली जाणार आहे. शहरातील कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे :
दिनांक ९ ऑगस्ट – प्रभाग क्र. १,२,५
दिनांक १० ऑगस्ट – प्रभाग क्र. ६,७,८
दिनांक ११ ऑगस्ट – प्रभाग क्र. ९,१०,११
दिनांक १२ ऑगस्ट – प्रभाग क्र. १२,१३,१४
दिनांक १३ ऑगस्ट – प्रभाग क्र. १५,१६,१७
दिनांक १४ ऑगस्ट – प्रभाग क्र. ३,४
दिनांक १५ ऑगस्ट – शहर व जिल्ह्यातील पदयात्रांची एकत्रित सभा
पदयात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा ७५ वर्षाचा देशाच्या उभारणीतील इतिहास मांडण्याचे काम करण्यात येणार असून देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी केलेले बलिदान व स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास तरुण कार्यकर्त्यांसमोर व जनतेसामोर मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच आज देशामध्ये वाढलेली प्रचंड महागाई, वाढलेली बेरोजगारी व एकंदरीतच देशातील सर्वच आघाड्यावर आलेले सरकारचे अपयश जनतेसमोर मांडले जाणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे