सासरे, जावई नगरकरांना वेडं समजतात का ? काँग्रेसचा संतप्त सवाल
नगरकरांना यातना देणारे खड्डे न दिसणाऱ्या जावई आमदारांना भिंगाचा चष्मा पाठवणार – किरण काळे

अहमदनगर . दि.६ ऑगस्ट २०२२(प्रतिनिधी): शहरामध्ये खड्डेच खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज नागरिकांना येत नाही. त्यामुळे अनेक अपघात देखील होत आहेत. थोडा पाऊस पडला तरी लोकांच्या घरात पाणी शिरते आहे. आता तर सीना नदीला पूर आला आहे. चांगले असणारे रस्ते उखडवून लावण्याचा अट्टाहास केला जात आहे. मात्र आमदार जावयाच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार सासरे शहराची वाटचाल विकसित महानगराकडे होत असल्याचा दावा करत आहेत. यावर सासरे, जावई नगरकरांना वेडं समजतात का ? असा संतप्त सवाल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
दिल्ली गेट ते न्यू आर्ट्स कॉलेज पर्यंतच्या रस्त्याच्या दुतर्फा पेव्हिंग ब्लॉक बसविण्याच्या कामाचा शुभारंभ करतेवेळी भाजपचे माजी आ. शिवाजी कर्डिले यांनी शहराची वाटचाल विकसित महानगराकडे होत असल्याचा दावा केला होता. यावेळी शहराचे राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप उपस्थित होते. भाजपला दूर ठेवत राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून जनतेसमोर गेलेले असताना शहरात पार पडलेल्या भाजप, राष्ट्रवादीच्या या कार्यक्रमा वेळी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसच्या काळे यांनी सडकून टीका केली आहे.
शहर विकासाचे नियोजन केल्याने नागरिक शहरात वास्तव्य करत आहेत असे यावेळी कर्डिले म्हणाले होते. यावर ही काळे यांनी निशाणा साधला असून नियोजनशून्य कारभारामुळे आणि विकासाचे व्हिजन नसलेल्या नेतृत्वामुळे नागरिक शहरात वास्तव्य करण्यास येत नसून शहराच्या बकालपणामुळे शरीरातील युवा पिढी शिक्षण, रोजगारासाठी अन्य शहरांकडे स्थलांतरित होत असल्याकडे लक्ष वेधले आहे.
*भिंगाचा चष्मा पाठवणार :
शहराची वाटचाल विकसित महानगराकडे सुरू असल्याचा दावा ज्या दिल्ली गेट वेशीकडे पाठ करून केला गेला, त्याच वेशीच्या आतमध्ये असणाऱ्या सबंध बाजारपेठेमध्ये जागोजागी खड्डे पडले आहेत. बाजारपेठ यामुळे उध्वस्त होण्याच्या मार्गावर असून व्यापारी वर्ग आणि बाजारात येणारे नागरिक हैराण आहेत. शहराच्या दुर्दशेमुळे आणि खड्ड्यांमुळे नागरिकांच्या भावना संतप्त असताना देखील या मंडळींना आपण खोटे दावे करत नगरकरांची चेष्टा करत आहोत याचे सुद्धा भान राहिले नसल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
शहर विकसित महानगराकडे अजिबात वाटचाल करत नसून शहराला बकाल करणारे खड्डे दिसावेत म्हणून जावई आमदारांना काँग्रेस नगरकरांच्यावतीने भिंगाचा चष्मा पाठवणार असल्याचे किरण काळे जाहीर केले आहे. माळीवाडा बस स्टँड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरणानंतर शिवप्रेमींची फसवणूक केल्याचा आरोप करत शिवचरित्र, छत्रपती संभाजी महाराज, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांची चरित्र काँग्रेसने शहराच्या आमदारांना पाठवली होती. ती त्यांनी नाकारली होती. आता काँग्रेसचा भिंगाचा चष्मा आमदार स्वीकारणार की नाकारणार याबद्दल नगरकरांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.
*भकासपर्व लवकरच :
शहर लोकप्रतिनिधींच्या वाढदिवसानिमित्त शहर विकासाचे संग्रामपर्व पुस्तकाचे प्रकाशन काही दिवसांपूर्वी करण्यात आले होते. यावर काँग्रेसने शहराच्या दुर्दशेकडे लक्ष वेधत शहरातील वास्तव मांडणाऱ्या शहर दुर्दशेचे भकासपर्व पुस्तक प्रकाशित करण्याचे जाहीर केले होते. या पुस्तकाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगत लवकरच या प्रकाशन केले जाणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.