संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव प्रशासनास सहकार्य करून उत्साहात साजरा करावा – आ रोहित पवार

कर्जत : दि १३ जुलै (प्रतिनिधी)
कर्जतचे ग्रामदैवत श्री संत सदगुरु गोदड महाराज यांचा रथोत्सव यंदा उत्साहात साजरा करणार असून यासाठी पुजेकरी, मानकरी, यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी प्रशासनास सहकार्य करावे. शांतता बैठकीत उपस्थित केलेल्या सूचना अंमलात येतील त्यानुसार प्रशासन निश्चित काम करेल. गोदड महाराज मंदिर यासह ग्रामप्रदक्षिणेला जाताना रथासोबत आणि मनोरंजन नगरीत पोलीस प्रशासन कडक बंदोबस्त राखेल अशी ग्वाही आ रोहित पवार यांनी दिली. ते मंगळवारी तालुका प्रशासन आयोजित श्री संत सदगुरु गोदड महाराज यात्रेनिम्मित शांतता बैठकीत बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदीप पुंड, मुख्याधिकारी गोविंद जाधव, जिल्हा उपरुग्णालयाचे डॉ सचिन डफळ, महावितरणचे सिंग, यात्रा कमिटीचे मेघराज पाटील, नगराध्यक्षा उषा राऊत यांच्यासह पुजेकरी, मानकरी, राजकीय पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ पवार म्हणाले की, कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानी राज्यातील भाविक-भक्त मोठ्या संख्येने संत सदगुरु गोदड महाराज यांच्या रथोत्सवासाठी कर्जत शहरात दाखल होतील. रथोत्सव शांततेत पार पाडणे प्रत्येकाचे कर्तव्य असून यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे. यासह गोदड महाराज मंदिरात अभिषेक, पुजा- आरती करताना, भाविक दर्शन घेताना मंदिरात अथवा मंदिर परिसरात जास्त गर्दी होणार नाही याची खबरदारी सर्वांनीच घ्यावी. संत सदगुरु गोदड महाराजांचा लाकडी रथ ग्रामप्रदक्षिणेसाठी शहरात जात असताना पुजेकरी, मानकरी आणि यात्रा कमिटीच्या सर्वच सदस्यांनी घेतलेल्या जबाबदारी व्यवस्थित पार पाडत रथोत्सव उत्साहात साजरा करावा असे आवाहन केले.
यावेळी सुरेश खिस्ती यांनी रथ प्रदक्षिणा मार्गावरील अवस्थेकडे लक्ष वेधत त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. यासह अनेक वर्षांपासून प्रदक्षिणा मार्गावरील विजेचे खांब अडथळा ठरत आहेत ते तसेच असून यामुळे दोन वर्षांपूर्वी अपघात झाल्याचे खिस्ती यांनी महावितरणच्या निदर्शनास आणून दिले. ते तात्काळ दूर करावी अशी सूचना केली. तसेच पोलीस प्रशासनाने मनोरंजन नगरीत छेडछाड होणार नाही, कोणी चोरी करणार नाही याबाबत दक्ष राहावे. नगरपंचायत प्रशासनाने या यात्राकाळात पाणीटंचाई होणार नाही याची खबरदारी घ्यावी. जे पाणी नळ योजनेला येईल ते शुद्ध असावे यासाठी उपाय योजना अमलात आणावी. दोन्ही दिवस गोदड महाराज मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवावा असे म्हंटले. यासह पुजेकरी पंढरीनाथ काकडे, प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत, तानाजी पाटील, दत्तात्रय शिंदे, प्रमोद महामुनी, पिटु आण्णा पाटील, बिभीषण खोसे, शहाजी नलवडे, बापाजी धांडे, काका धांडे, अनिल गदादे, संतोष नलवडे आदींनी प्रशासनासमोर यात्रा काळात येणाऱ्या अडचणी समोर मांडत त्यावर तोडगा काढावा अशा सूचना मांडल्या. शेवटी प्रशासनाकडून प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी उपस्थित केलेल्या सर्व सुचनेवर प्रशासन काम करणार असून संत सदगुरु गोदड महाराजांचा रथोत्सव शांततेत साजरा करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपस्थितांना केले.
*******: यात्राकाळातील तीन दिवस कर्जत नगरपंचायतीने बाहेरून किंवा गावातील विक्रेत्याकडून कर घेऊ नये अशी मागणी यात्रा कमिटीच्यावतीने करण्यात आली आहे. त्यावर कर्जत नगरपंचायत विचार करेन अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. यासह संत सदगुरू गोदड महाराजांचा रथ ग्रामप्रदक्षिनेस मुख्य रस्त्यावर आल्यास वाहतुकीस पर्याय उपलब्ध करावा. जेणेकरून शहरात वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी पोलीस प्रशासनाने कडक उपाय-योजना राबवावी अशी मागणी उपस्थितांना बैठकीत केली.