गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी शहर जिल्हा महिला काँग्रेसने पंतप्रधानांना पाठविले पत्र शेणाच्या गौऱ्या हातात घेऊन केली निदर्शने, पंधरा लाख रुपयांच्या वाद्याची ही करून दिली आठवण

————————————–
अहमदनगर दि.१३ जुलै ( प्रतिनिधी) : अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, स्नेहलताई काळे, राणीताई पंडित यांच्या नेतृत्वाखाली अभिनवरित्या निदर्शने करत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून चक्क शेणाच्या गौऱ्या हातात धरत महिला काँग्रेसने निदर्शने केली आहेत. तसेच पंतप्रधानांना गॅस दरवाढ कमी करण्यासाठी पत्र पाठविले आहे.
मे महिन्यामध्ये मोठी गॅस दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पन्नास रुपयांची दरवाढ करण्यात आली असून आता गॅससाठी नागरिकांना रु. १०५३ एवढी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशावरून नगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात मोहीम राबविण्यात आली. यावेळी शारदाताई कर्डिले, रोहिणी कदम, पूजा वाबळे, मनोरमा बुलाखे आदींसह महिलांनी गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली.
पंतप्रधानां पाठविलेल्या पत्रामध्ये महिला काँग्रेसने म्हटले आहे की, देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच गॅस दर प्रचंड वाढले असून गगनाला भिडले आहेत. कोरोना महामारीमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यांमधून अजूनही नागरिक पूर्णत: सावरलेले नाहीत. यामुळे मासिक उत्पन्न घटले आहे. केंद्र सरकारने गॅसच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे आमच्या महिला वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. परमेश्वर केंद्र सरकारला गॅसची दरवाढ तातडीने कमी करण्याची सद्बुद्धी देवो असे म्हणायला देखील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या विसरलेल्या नाहीत.
मोदी सरकारच्या मर्मावर बोट ठेवत पत्रात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टी सत्तेत नसताना थोडी जरी गॅस दरवाढ झाली तर भारतीय जनता पार्टीचे नेते, महिला, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने, आंदोलन करायचे. आता तर देशात भाजपची सत्ता आहे. तरी सुद्धा भाववाढ होतच आहे. पण त्यावेळी आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे गायब झाले आहेत ? असा सवाल महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित केला आहे.
📌 *पंधरा लाख रुपयांच्या वाद्याची करून दिली आठवण
———————————–
पत्राच्या शेवटी महत्त्वपूर्ण विनंती असे म्हणत पंतप्रधानांना २०१४ च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी केलेल्या पंधरा लाख रुपयांच्या वाद्याची ही आठवण करून द्यायला महिला पदाधिकारी विसरलेल्या नाहीत. या पूर्वी देखिल महिला काँग्रेसने याची आठवण पंतप्रधानांना करून दिली होती. मोदी सरकार सत्तेत येऊन जवळपास आठ वर्षे उलटली तरी देखील आमच्या खात्यावर पंधरा लाख रुपये आपण वचन दिल्याप्रमाणे अद्यापही जमा झालेले नाहीत. तेवढे तात्काळ पाठवून द्यावेत, असे नमूद करत मोदी सरकारला त्यांनी केलेल्या चुनावी जूमल्याची आठवण महिला काँग्रेसने करून दिली आहे.