अल्पमतात आलेल्या महाविकास आघाडीचा सरकारचा विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा दावा हास्यास्पद – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.28 जून (प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले असून त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या स्थितीत राजीनामा द्यायला पाहिजे होता.अल्पमतात आलेले महाविकास आघाडी सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचा करीत असलेला दावा हास्यास्पद आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.
शिवसेनेचे 40 हुन अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. काही अपक्ष आमदार शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आहे.त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. आता बहुमत भाजप; एकनाथ शिंदे आणि महायुती कडे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या हितासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सरकार स्थापनेचा दावा लवकर करावा असे आवाहन ना.रामदास आठवले यांनी केले आहे.
शिवसेने चे जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत त्यांच्या कार्यालयावर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत.पोलिसांच्या समोर हल्ले होत असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाच्या परंपरेचा वारसा आहे. त्यावर हल्ला होत आहे. राज्याची प्रतिमा डागाळली जात आहे. यावर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कठोर भूमिका घेऊन पोलिसांना कायदा सुव्यवस्थेबाबत कर्तव्य पार पाडण्याचे निर्देश द्यावेत.असे मत ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
शिवसेने ने पराभव स्वीकारला पाहिजे. त्यासाठी आमदारांच्या कार्यालयावर हल्ले करणे ; गुंडगिरी करणे योग्य नाही. शिवसेनेने गुंडगिरी
थांबवावी. अन्यथा गुंडगिरीला गुंडगिरीने उत्तर द्यावे लागेल. गुंडगिरी ने शिवसेना सरकार वाचवू शकणार नाही असा ईशारा ना.रामदास आठवले यांनी दिला आहे.