राजकिय
कर्जत शहरात राम शिंदेचे जंगी स्वागत, दोन भव्य फुलांच्या हारात राम शिंदे गुंफले

- कर्जत (प्रतिनिधी ): दि २२ जून
विधानपरिषदेत आपला विजय साकार केल्यानंतर माजीमंत्री राम शिंदे यांच कर्जत तालुक्यात भाजपाकडून जोरदार भव्य स्वागत करण्यात आले. सिद्धटेक येथील सिद्धीविनायकच दर्शन घेत राम शिंदे कर्जत तालुक्यात दाखल झाले. शिंदे यांचे विविध ठिकाणीजोरदार विजयी घोषणेने वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. शिंदेंनी देखील सर्वसामान्य मतदारांना अभिवादन करीत धन्यवाद व्यक्त केले.
कर्जत शहरात शासकीय विश्रामगृहाजवळ राम शिंदेच्या विजयी मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नेत्यांनी डीजेच्या तालावर ठेका धरीत आपल्या अडीच वर्षाच्या वनवासाची सांगता केली. कोण आला रे कोण आला कर्जत जामखेडचा वाघ आला. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. राम शिंदे साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है या विजयी घोषणेने महासती अक्काबाई मंदिरात दर्शन घेत विजयी मिरवणूक शहरात दाखल झाली. यावेळी शहरात ठिकठिकाणी राम शिंदेचे जोरदार स्वागत करीत पदाधिकाऱ्यांनी आपले प्रेम व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ईदगाह मैदान याठिकाणी दोन मोठे भव्य फुलांच्या हारात राम शिंदेंना गुंफण्यात आले. शेवटी ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांचे मंदिरात दर्शन घेत आरती करीत विजयी मिरवणुकीची सांगता करण्यात आली. आणि राम शिंदे चोंडीकडे रवाना झाले.
यावेळी सत्कारास उत्तर देताना राम शिंदे म्हणाले की, संत श्री सदगुरु गोदड महाराजाच्या कृपेने कर्जत-जामखेडमध्ये काम करण्याची पुन्हा संधी मिळाली. मंत्रीपदाच्या कार्यकाळात भरपूर विकास करीत मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम प्रामाणिकपणे पार पाडले. मात्र गेल्या अडीच वर्षात जो आपला अभिमान आणि स्वाभिमान गहाण ठेवल्याची भावना सर्वसामान्य माणसांमध्ये निर्माण झाली होती ती निश्चितपणाने गोदड महाराजांनी आपल्या सर्वांची दुखणी ऐकून घेतली. आणि भाजपाच्या राष्ट्रीय आणि राज्याच्या नेतृत्त्वाने आपल्याला न्यायिक भूमिका दिली.आणि विधान परिषदेत आपल्याला संधी मिळाली. आज गोदड महाराजाच्या दर्शनापूर्वीच राज्यातील महाविकास आघाडीच सरकार बरखास्त झालं असल्याची चित्र पहावयास मिळत आहे. महाराजाच्या भूमीत अनैतिक, अन्याय, अत्याचार चालत नाही. संत सदगुरु गोदड महाराज आणि चोंडीला अहिल्यादेवीचे दर्शनापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्रीना सदबुद्धी सुचली आणि त्यांनी राज्यपालांकडे सरकार बरखास्तीचा प्रस्ताव पाठविला असल्याचे म्हणत जे अडीच वर्षात मतदारसंघात घडले ते तुमच्या व माझ्या लक्षात आहे. त्यामुळे आपल्या कार्यकाळात जसे कारभार होत होता तो आगामी काळात पुन्हा होईल. सर्वसामान्य जनतेच्या हिताचं आणि त्यांच्या अभिमनाच व स्वाभिमानच कार्य पुन्हा करण्याची ग्वाही राम शिंदेंनी उपस्थित जनतेला दिली.
चौकट : राम शिंदे आणि सचिन पोटरे भावूक
एकीकडे भाजपातील जुने स्थानिक नेते राम शिंदेंची साथ सोडत असताना सचिन पोटरे आणि किसान मोर्चाचे सुनील यादव यांनी शिंदेंना स्थानिक राजकारणात साथ देण्याचे उत्तम जबाबदारी पार पाडली. आजच्या विजयी मिरवणुकीत राम शिंदे आणि सचिन पोटरे यांची भेट मिरवणुकीच्या वाहनांवर घडली. आणि काही काळ दोघेही गळा भेट घेत असताना भावूक झाले होते. तर राम शिंदे यांनी आपल्या स्वताच्या गळ्यातील गुलाब पुष्पांचा हार सुनील यादव यांच्या गळयात घालत आपले प्रेम व्यक्त केले. पोटरे आणि यादव दोघेही या अनपेक्षित प्रेमाने चांगलेच भारावून गेले होते.
2) विजयी मिरवणुकीची सांगता आणि वरुणराजाचे आगमन
राम शिंदेंची विजय मिरवणुकीची सांगता ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराजांच्या दर्शन आणि आरतीने झाली. अवघ्या काही वेळातच शहरात पावसास सुरुवात झाली. यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यानी “साहेबांचं पायगुण आणि वरुणराजाची हजेरी” असे स्टेटस सोशल मीडियावर व्हायरल केले. २०१९च्या विधानसभेला देखील अर्ज दाखल केल्यानंतर शहरात मुसळधार पाऊस झाला होता.