नगर अर्बन बँकेच्या १५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एकास अटक!

श्रीगोंदा दि.१५ जून (प्रतिनिधी):नगर अर्बन बँकेच्या १५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एकास अटक करण्यात आली आहे.याबाबत मिळालेल्या माहतीनुसार नगर अर्बन बँकेच्या १५० कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल गुह्यातील आरोपी सचिन दिलीप गायकवाड (रा.श्रीगोंदा) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी श्रीगोंदा येथून अटक केली आहे. तपासी अधिकारी (पोलीस निरीक्षक) आव्हाड यांच्या पथकाने कारवाई केली आहे. बँक बचाव कृती समितीचे प्रमुख व बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांनी दि.१७ फेब्रुवारी २०२२ रोजी नगर अर्बन बँकेचे तत्कालीन अध्यक्ष,संचालक मंडळ,वरिष्ठ अधिकारी व २८ संशयास्पद कर्जदारांचे कर्जखाते,तत्कालीन अध्यक्षांचे निकटचे कार्यकर्ते सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांच्याविरुद्ध १५० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.तपासा दरम्यान यातील आरोपी गायकवाड याच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने रकमा जमा झाल्या होत्या..?याचा तपास सुरू करण्यात आला होता.त्यावेळी त्याच्या खात्यात बँकेने परस्पर पैसे वर्ग केल्याचे तपासामध्ये उघड झाले होते. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली होती.मात्र,त्याचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.याबाबत सविस्तर माहिती अशी की,मा.न्यायालयाने आरोपी सचिन गायकवाड याचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता.त्यानंतर मा. न्यायालयाने गायकवाड याला दि.२० जून २०२२ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.फिर्यादी गांधी यांनी त्यांच्याकडील पुरावे न्यायालयासमोर मांडले आणि आरोपी गायकवाड याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानतंर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने पोलीस निरीक्षक आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गायकवाड याला अटक केली आहे.