योग्य पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये – तालुका कृषी अधिकारी म्हस्के

कर्जत (प्रतिनिधी) : दि ११ जून
कर्जत तालुका परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असे आवाहन तालुका कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के यांनी केले.
यावेळी बोलताना म्हस्के पुढे म्हणाले की, सध्याचे हवामान अंदाजानुसार पावसाचे आगमन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बाजारात बियाणे, खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून शेतकऱ्यांनी जमिनीची पूर्व मशागत करून ठेवलेली आहे. यासह त्यांना लागणारी बियाणे व खतांची खरेदी करण्यात आली आहे. मात्र पुरेसा पाऊस झाल्याशिवाय म्हणजेच ८० ते १०० मिमी पावसाची नोंद झाल्यावरच पेरणी करावी असे आवाहन म्हस्के यांनी शेतकऱ्यांना केले आहे. तसेच कोणत्याही कृषी सेवा केंद्रातून बियाणे खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. बियाणे वापरताना बियाण्याची पिशवी उलट्या बाजूकडून फोडून बियाणे वापरावे. त्यातील १० ते १५ ग्रॅम बियाणे, टॅग पिशवीसह जतन करावे. घरगुती बियाण्याचा वापर त्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी. बियाणे पेरणी अगोदर त्यावर रासायनिक अथवा जैविक बीजप्रक्रिया करावी. पेरणी शक्यतो बीबीएफ यंत्रानेच करण्यात यावी. हुमणी नियंत्रणासाठी शेतामध्ये प्रकाश सापळे लावून कीड नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. बियाणे खरेदी करताना कोणत्याही पिकामध्ये विशिष्ट वाणाचा अट्टहास धरून ज्यादा किमतीने बियाणे खरेदी करू नये असे आवाहन कर्जत कृषी विभागाच्यावतीने प्रसिद्ध पत्रक काढत शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.