ओबीसी आरक्षण निश्चित झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अहमदनगर राष्ट्रवादी ओबीसी सेल उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

अहमदनगर दि.२७ मे (प्रतिनिधी)- ओबीसी आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, अशी मागणी अहमदनगर राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी राष्ट्रवादी ओबीसी सेलचे नगर शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर,राष्ट्रवादी केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर,अनिकेत येमुल,शिवाजी खरपुडे, बंटी खेतमळस आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा घालून दिली आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी इम्पिरिकल डेटा मागास वर्ग आयोगाकडून प्राप्त करून घ्यावा. त्यासाठी आयोगाला लागणारी आर्थिक तरतूद करून द्यावी. प्रसंगी दोन तीन महिने निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या तर त्या पुढे ढकलाव्या, परंतु ओबीसींचे राजकीय आरक्षण निश्चित झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत.
मागासवर्गीय आयोगाची स्थापन झालेला आहेच, इम्पिरिकल डेटा प्राप्त झाला तर त्यामाध्यमातून ओबीसींची जातनिहाय जनगणनासुद्धा करुन घ्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे.