कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना उत्कृष्ट तहसीलदार पुरस्कार, यासह तहसीलच्या अव्वल कारकून किशोरी त्र्यंबके उत्कृष्ट कर्मचारी

कर्जत (प्रतिनिधी) : दि ३० जुलै अहमदनगर जिल्हा महसुल विभागात तहसीलदार संवर्गात २०२१-२२ वर्षात कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी उत्कृष्ट आणि लोकाभिमुख कार्य पार पाडल्याबद्दल त्यांना “उत्कृष्ट तहसीलदार” होण्याचा बहुमान मिळाला आहे. यासह कर्जत महसूल विभागाच्या अव्वल कारकून संवर्गात किशोरी त्र्यंबके यांनी देखील उत्कृष्ट कर्मचारी होण्याचा बहुमान पटकावला आहे. कर्जत महसूल विभागाला यंदा दोन बहुमान मिळाले आहे.
दरवर्षी १ ऑगस्ट रोजी महसूल दिन साजरा करण्यात येतो. या दिवशी महसूल विभागात वर्षभरात अधिकारी-कर्मचारी यांनी केलेल्या विशेष उल्लेखनीय आणि लोकाभिमुख कार्याचा गौरव करण्यात येतो. १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२२ या वर्षात कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी तहसीलदार संवर्गात विशेष उल्लेखनीय कार्य पार पाडल्याबद्दल त्यांना “उत्कृष्ट तहसीलदार” म्हणून बहुमान मिळाला आहे. यापूर्वी देखील आगळे यांना नाशिक विभागाकडून “एम्पलॉयी ऑफ द मंथ” पुरस्कार कर्जतच्या तहसीलदार कार्यकाळामध्येच प्राप्त झाला होता. आगळे यांच्या पाठोपाठ कर्जत तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकून किशोरी त्र्यंबके यांना देखील अव्वल कारकून संवर्गात “उत्कृष्ट कर्मचारी” म्हणून बहुमान मिळाला आहे. तहसीलदार आगळे आणि अव्वल कारकून त्र्यंबके यांना सोमवार, दि १ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हा सन्मान दिला जाणार आहे. दोन्ही पुरस्कार विजेत्याचे प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, निवासी नायब तहसीलदार सुरेश वाघचौरे, नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले, शिरस्तेदार पाडळे रावसाहेब यांच्यासह कर्जत उपविभाग आणि तहसील विभाग यांनी विशेष अभिनंदन केले.