समाजवादी पार्टीचे नगरसेवक आसिफ सुलतान यांचा महसूल मंत्री ना. थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
जिल्हाध्यक्ष किरण काळेंची मोठी राजकीय खेळी, मुकुंद नगरमध्ये काँग्रेसची जोरदार बांधणी

अहमदनगर दि.७ मे (प्रतिनिधी) : अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी मोठी राजकीय खेळी केली आहे. मुकुंद नगरमध्ये काळे यांनी काँग्रेसमध्ये जोरदार बेरीज करत समाजवादी पार्टीचे विद्यमान नगरसेवक आसिफ सुलतान यांचा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. संगमनेर कारखान्याच्या विश्रामगृहावर हा प्रवेश पार पडला आहे. यावेळी सुलतान यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील, इंटक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. हनीफ शेख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुलतान हे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एमआयएमच्या चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवत सुमारे सात हजारांहून अधिक मतदान मुकुंदनगर तसेच अल्पसंख्याक भागातून घेतले होते. ते स्वतः इंजिनिअर असून उच्चशिक्षित असल्याने त्यांनी महानगरपालिकेच्या कारभारामध्ये आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. सुलतान यांच्या रूपानं काँग्रेसला अल्पसंख्यांक समाजातील चांगला चेहरा गळाला लागला आहे.
मागील आठवड्यात जिल्हाध्यक्ष काळे यांनी मंत्री ना. थोरात यांच्या माध्यमातून शहराच्या विकास कामांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी आणला होता. यापैकी रु. ७६ लाख मुकुंद नगर मधील विकासकामांसाठी काँग्रेसने निधी आणला आहे. त्यातच आता नगरसेवक सुलतान हे काँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे सुलतान यांना देखील त्या ठिकाणी मोठे बळ ना.थोरात, काळे यांच्या माध्यमातून मिळाले आहे.
काँग्रेस प्रवेशानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेवक सुलतान म्हणाले की, आज देशातील एकूण परिस्थिती पाहिली तर देशाला काँग्रेस विचारधारा हीच एकसंध ठेऊ शकते. नगर शहरामध्ये राजकीय परिस्थितीचा अभ्यास केला तर आज सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढणाऱ्या निर्भीड नेतृत्वाची गरज आहे. किरण काळे यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस नगर शहरामध्ये भक्कमपणे उभी राहिली आहे. त्यामुळेच मी काळे यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाकडे आकर्षित होत त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला असून आगामी काळामध्ये अल्पसंख्यांक भागातून काँग्रेस पक्षासाठी मजबूत संघटन उभे करणार आहे.
किरण काळे म्हणाले की, आसिफ सुलतान यांना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वतोपरी ताकद देण्याचे काम केले जाईल. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना बळ दिले जाईल. त्यांच्यावर महत्वपूर्ण संघटनात्मक जबाबदारी देखील लवकरच सोपवली जाणार असून ते काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निश्चितच चांगले योगदान देतील असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला आहे.