छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन ठरला सार्थ! शिवद्रोही श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार !

अहमदनगर दि.६ जून (प्रतिनिधी)छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन सार्थ झाल्याच्या चर्चा नगर शहरातून नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.६ जून शिव राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराज बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले आहेत.
श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांच्या विरुद्ध नगर शहरात संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून दुखापत करणे, गंभीर दुखापत रक्कम बळजबरीने काढून घेणे, जिवे ठार मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मीक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे मालाविरुद्ध व शरिराविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. शहरात दहशत निर्माण श्रीपाद शंकर छिंदम व श्रीकांत शंकर छिंदम (रा. मोहनबाग, दिल्लीगेट) यांना पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यातून १ वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठवला होता. अधीक्षक पाटील यांनी त्याला मंजुरी देत दोघांनाही जिल्ह्यातून तडीपार केले आहे.