राजकिय

शहर विद्रुपीकरणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस – राष्ट्रवादी आमने – सामने, आयुक्तांना काँग्रेसने भेट दिले भिंग ; अनधिकृत होर्डिंग खाली उतरवा, शहर काँग्रेसची मागणी आयुक्तांना किरण काळेंनी धरले धारेवर

अहमदनगर दि.२७ जून (प्रतिनिधी) : शहर विद्रूपिकरणाचा मुद्दा चांगलाच गाजणार असे दिसत आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी आता आमने-सामने आली आहे. जननायक स्व.अनिलभैय्या राठोड यांचा फोटो जुन्या मनपाच्या वास्तूवर लावत नामकरण केल्यावरून किरण काळेंसह काँग्रेसच्या पंचवीस कार्यकर्त्यांवर मनपा आयुक्तांनी विद्रूपिकरण कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आता काँग्रेसने मनपा आयुक्तांना शहर विद्रूपिकरण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र ज्या दिवंगत शिवसेना नेत्यावरून या विषयाला सुरुवात झाली त्या शिवसेनेने मात्र या विषयावर चुप्पी साधली आहे हे विशेष.

यावेळी आयुक्त पंकज जावळे यांना शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी चांगलेच धारेवर धरले. शहरात अनधिकृत होर्डिंग मोठ्या प्रमाणावर असून यामुळे शहर विद्रूप झाले असल्याचे म्हणत काँग्रेसने आधी हे होर्डिंग खाली उतरवा, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे केली आहे. आयुक्त जावळे यांच्या नजरेतून शहर विद्रूपीकरण सुटू नये यासाठी नागरिकांच्या वतीने काँग्रेसने भिंग भेट दिले आहे. हे भिंग आपण हरवू नये, अशी ताकीद आयुक्तांना काँग्रेसने दिली आहे. जिथे, जिथे विद्रूपीकरण केल्याचे आपल्याला या भिंगातून नजरेस पडेल त्या ठिकाणी आपण तात्काळ उचित कायदेशीर कारवाई करावी, असा खोचक टोला काँग्रेसच्या वतीने काळेंनी आयुक्तांना लगावला आहे.

जुने मनपा कार्यालय विद्रूपीकरणाचे फोटो आयुक्तांनाच काँग्रेसने दाखवले. कचरा संकलन व्यवस्था कोलमडलेली असल्यामुळे चौकाचौकात कचरा पडलेला आहे. शहरात रस्त्यांना जागोजागी खड्डे आहेत. पावसाचे पाणी त्यात साचून अपघात होत आहेत. भ्रष्टाचार सुरू आहे. यामुळे झालेले विद्रूपीकरण तुम्हाला दिसत नाही का ? असा खडा सवाल काळे यांनी विचारला. यावेळी आयुक्तांची भांबेरी उडाली. मनपानेच शहर केवढे केवढे विद्रूप केले आहे हे निदर्शनास आणून दिल्यानंतर आयुक्त मात्र निरुत्तर झाले. काळे म्हणाले की, नुकताच शहराच्या आमदारांचा वाढदिवस झाला. या निमित्ताने शहरभर चौका – चौकात रस्त्यात अडथळा निर्माण करत फ्लेक्स लावून विद्रूपीकरण करण्यात आले. परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या अनधिकृत व बेकायदेशीर होर्डिंग्सचा देखील यासाठी वापर करण्यात आला.

आयुक्तांवर विद्रुपीकरण रोखण्याची जबाबदारी मा. न्यायालयाच्या आदेशान्वये आहे. मात्र ही जबाबदारी पार पाडण्यात आयुक्त पक्षपातीपणा करत हेतूपरस्पर कसूर करत आहेत. हे खेदजनक आहे. त्यामुळे कॉग्रेसची आमची नागरिकांच्या वतीने मा.न्यायालयाच्या आदेशाच्या आदेशान्वये शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत. सर्वांना समान नजरेतून पहावे अशी मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे.

शहर विद्रूपीकरण करत मनपाचा कर चुकवून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या होर्डिंगच्या मालकांना तात्काळ नोटीस बजावण्यात यावी. सदर अनधिकृत होर्डिंग विरुद्ध कारवाई करत ते तात्काळ काढून टाकण्यात यावेत. मुळात मनपा आयुक्तांनी न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने शहर विद्रूपीकरणाला घातलेले खतपाणी हे शहराला विद्रुप करण्यासाठी कारणीभूत आहे असता घनाघात यावेळी आयुक्तांवर काळेंनी केला. यावेळी अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगचे पुरावे काँग्रेसने आयुक्तांना सादर केले.

यावेळी काळे यांच्यासह दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, आकाश आल्हाट, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, गौरव घोरपडे, सुनील लांडगे, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, धनंजय देशमुख, प्रणव मकासरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे