मी मेलो त्याची गोष्ट’ वेदनादायी काळाचा अचूक वेध घेते प्रा. रंगनाथ पठारे.

राहुरी / प्रतिनिधी :- संजय कळमकर यांची ‘मी मेला त्याची गोष्ट ‘ ही कादंबरी कोरोनाच्या वेदनादायी काळाचा अचूक वेध घेते . मला या कादंबरीच्या रचनेची गोष्ट अत्यंत वेधक वाटली. असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त जेष्ठ लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा, अहमदनगर व शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संजय कळमकर यांच्या ‘मी मेलो त्याची गोष्ट’ या कादंबरी च्या प्रकाशन समारंभात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास मृद व जल संधारण मंत्री ना. शंकरराव गडाख, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधाकर शेलार, अभिनेते मोहिनिराज गटणे, शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, मसाप नगर शाखेचे अध्यक्ष किशोर मरकड आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा. रंगनाथ पठारे म्हणाले की, डॉ. संजय कळमकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मला विशेष कौतूक वाटते .प्रत्येक क्षेत्रात अत्यंत जोरकस पणे आपले अस्तित्व निर्माण करणारा माणसातला माणूस अशी त्यांची राज्यभर ओळख आहे. कोरोना महामारी व लॉक डाऊन च्या संकटामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील दरी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यातील बारकावे कळमकर यांनी या कादंबरी मध्ये तपशीलवार पणे मांडले आहेत.
ना. शंकरराव गडाख म्हणाले की, कोरोना या आजारामुळे संपूर्ण समाज अक्षरशः ढवळून निघाला. प्रत्येक कुटुंबाला त्याची झळ सोसावी लागली. कोरोना च्या दुसऱ्या लाटेने तर हाहाकार उडवून दिला. औषधोपचाराचा तुटवडा जाणवला. तेव्हा माणसातली माणुसकी कामी आली. पैसा, पद, सत्ता याला काही महत्व नाही. ही गोष्ट कोरोना ने अधोरेखित केली. कोरोनाने आपल्याला बरेच काही शिकवलं. त्याच प्रमाणे एकमेकांना सोबत घेऊन समाजात सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्यासाठी या कादंबरीचा निश्चितपणे उपयोग होईल. डॉ. कळमकर यांनी यापुढील काळातही भर भरून लिहीत राहावे असे ते म्हणाले.
समीक्षक डॉ. सुधाकर शेलार म्हणाले की, ‘मी मेलो त्याची गोष्ट’ या कादंबरीत डॉ. संजय कळमकर यांनी कोरोना झालेल्या व्यक्तीच्या मनाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. या कादंबरीत त्यांनी मृत्यूचं एक सुंदर रूपक वापरले आहे. त्याच बरोबर व्यक्ती चित्रण आणि फ्लॅश बॅक तंत्राचा अचूकपणे वापर करून ही कादंबरी फुलविली आहे. कोरोना आपण सर्वांनीच अनुभवला. मात्र एखाद्या परिचित गोष्टीची अपरिचित गोष्ट सांगण्याची कला लेखकाकडे असते. तशी ती डॉ. कळमकर यांच्याकडे आहे. एक अनामिक पक्षी खिडकीत येतो आणि या कादंबरीतील नायकाला आपल्या सोबत घेऊन जातो. असे मृत्यूचं एक सुंदर रूपक त्यांनी वापरले आहे. मराठी साहित्याच्या इतिहासाला या कादंबरीची नोंद घ्यावीच लागेल असे ते म्हणाले.
डॉ. संजय कळमकर म्हणाले, या कादंबरीत एका शेतकऱ्याच्या मुलाची गोष्ट मी सांगितली आहे. साहित्याने सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा असे मानणाऱ्यांपैकी मी एक आहे. कोरोना हा विषय विनोद करण्यासारखा नाही मात्र कोरोना काळात खेड्या पाड्यात अनेक गंमती जमती घडल्या. त्याच बरोबर या कादंबरीतून अनेक चांगल्या आणि खऱ्या गोष्टीही आपल्याला समजतील असे ते म्हणाले.
प्रा. रवींद्र काळे यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब नगरे यांनी सूत्रसंचालन केले. शब्दगंधचे संस्थापक सुनिल गोसावी यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सुमती लांडे, प्रा. मेधा ताई काळे, चंद्रकांत पालवे, दशरथ खोसे, प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, प्राचार्य चंद्रकांत भोसले, ज्ञानदेव पांडुळे, बापूसाहेब भोसले, प्रा. डॉ. संदीप सांगळे, भगवान राऊत, शर्मिला गोसावी,डॉ तुकाराम गोंदकर, बबनराव गिरी,बाळासाहेब शेंदूरकर,जयश्री झरेकर, आदी उपस्थित होते. स्वागत किशोर मरकड आभार सुनिल गोसावी तर सूत्रसंचालन भाऊसाहेब नगरे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गुरुकुल शिक्षक मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
******
कितीही व्यस्त असलो तरी संजय कळमकर यांचा एकही कार्यक्रम मला चुकवता येत नाही . आमचे मैत्रीचे संबंध दृढ आहेत . त्यांनी सातत्याने लिहित रहावे असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले .