धर्मांध यती नरसिंहानंद सरस्वती यांच्या विरोधात अहमदनगर येथील तोफखाना पोलिसांकडून अखेर एफ.आय.आर दाखल
यू-ट्युब वरील आक्षेपहार्य व्हीडीओच्या आधारे राष्ट्रीय पातळीवर धर्मांध व्यक्तीविरोधात नोंद झालेला जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा

अहमदनगर (प्रतिनिधी)
यती नरसिंहानंद सरस्वती या धर्मांध स्वयंघोषित धर्मगुरू विरुद्ध गुन्हा नोंदवावा असे आदेश अहमदनगर येथील न्यायालयाने दिले आहेत. यु-ट्युब वरील आक्षेपहार्य, बदनामीकारक व्हीडीओच्या आधारे राष्ट्रीय पातळीवर चर्चेत असलेल्या धर्मांध व्यक्तीविरोधात नोंद झालेला हा अहमदनगर जिल्ह्यातील पहिलाच गुन्हा आहे.
तक्रारदार अर्षद शेख, बहिरनाथ वाकळे आणि अनंत लोखंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दि.१७/२/२०२२ रोजी रात्री उशिरा एफ.आय.आर नोंदऊन घेतला. “आता यती नरसिंहानंद सरस्वती समोर तीन कायदेशीर पर्याय आहेत .त्यांना एकतर अहमदनगर न्यायालयातून जामीन घ्यावा लागेल किंवा पोलिसांना त्यांना अटक करून अहमदनगरला आणावे लागेल. तसेच यती नरसिंहानंद सरस्वती एफ.आय.आर नोंदविण्याच्या प्रक्रियेला उच्च न्यायायालयात आव्हान सुद्धा देऊ शकतात” असे अॅड.असीम सरोदे म्हणाले.
यती नरसिंहानंद सरस्वती याच्या विरोधात २३ जुलै २०२१ रोजी अहमदनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अर्षद शेख, बहिरनाथ वाकळे आणि अनंत लोखंडे यांनी अॅड.असीम सरोदे यांच्यामार्फत खाजगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीची दखल घेऊन अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एम. निराळे यांनी सात महिन्यांच्या दीर्घ कालावधी नंतर फौजदारी प्रक्रियेच्या संहिता १५६ (३) नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिनांक २५/१/२०२२ रोजी दिले होते. देशतील एकतेवर, अखंडतेवर आणि बंधुतेवर आघात करणाऱ्या यती नरसिंहानंद सरस्वती याच्या विरोधात अहमदनगर येथील तोफखाना पोलिसांनी चौकशी करून एफ.आय.आर दाखल केल्याने तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे. अहमदनगर येथील तोफखाना पोलिसांनी धर्मांध यती नरसिंहानंद सरस्वती याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३(अ), कलम १५३(ब), कलम २९५(अ) व कलम ५०५ अंतर्गत एफ.आय.आर दाखल
“या अश्या घटनांमुळे ‘यती नरसिंहनंद सरस्वती’ सारख्या मानसिकता असणाऱ्या लोकांना धर्म संसदेसारख्या विध्वंसक विचाराच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यास पाठबळ मिळत आहे. न्यायलयाने दिलेल्या या आदेशामुळे आणि तोफखाना पोलिसांकडून घेण्यात आलेल्या सकारात्मक भुमिकेमुळे द्वेषमुलक वक्तव्य करणाऱ्यांवर नक्कीच चाप बसेल.” असे मत तक्रारदरांनी व्यक्त केले आहे
तक्रारदारांचे वकील अॅड. असीम सरोदे व त्यांची लीगल टिम अॅड. मदन कुऱ्हे, अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. तृणाल टोणपे, अॅड. सुनयना मुंडे, नालंदा आचार्य, अभिजित पाटील, अस्मा क्षीरसागर, सिद्धी जागडे, ऋषिकेश शिंदे, मेखला गांगुर्डे यांनी केस संदर्भातील रिसर्च साठी महत्वाचे कायदेशीर काम केले. या व्यतिरिक्त अॅड. शेख फारुख बिलाल, अॅड. शेख इरफान व अॅड. शेख साकिब यांनी सहकार्य केले.