पाळणा दुर्घटनेतील जखमींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत:पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

शिर्डी,दि.७ एप्रिल (प्रतिनिधी) – शिर्डी येथील पाळणा दुर्घटनेमध्ये जखमी झालेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांची महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मिळवून देणार असल्याची ग्वाही देत तसेच नाशिक येथील अशोका रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत म्हणून रुग्णालय प्रशासनाशी बोललो असल्याचेही महसूलमंत्र्यांनी कुटुंबीयांना यावेळी सांगितले.
आज शिर्डी येथे आल्यानंतर महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह या कुटुंबाच्या निवासस्थानी जावून त्यांच्याशी संवाद साधला. याभेटी दरम्यान छत्रपती शासन या संघटनेच्या वतीने १ लाख २१ हजार रुपयांचा धनादेश महसूलमंत्र्यांच्या हस्ते या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी शिवाजीराव गोंदकर, कैलास कोते, सदाभाऊ शिंदे, नितीन कोते, अभय शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या दुर्घटनेतील दोन्हीही जखमींवर सध्या नाशिक येथील अशोका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उपचारासाठी मोठा खर्च सांगितल्यानंतर दोन दिवसांपूर्वी महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी अशोक कटारीया यांच्या संपर्क साधून या रुग्णांवर मोफत उपचार करण्याची केलेली विनंती रुग्णालय प्रशासनाने मान्य केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतूनही या रुग्णांना आर्थिक मदत मिळावी म्हणून मुख्यमंत्र्यांशी बोललो असून, लवकरच ही मदतही मिळेल अशी ग्वाही ही त्यांनी दिली.