देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 जून:
अहिल्यानगर एमआयडीसी येथील क्लासिक व्हील्स लिमिटेड (एल-२) कंपनीमध्ये महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना (सी.आय.टी.यू. संलग्न) यांच्या नव्याने स्थापन झालेल्या शाखेच्या फलकाचे भव्य अनावरण गुरुवार, दि. २५ जून रोजी दुपारी २.३० वाजता कमालीच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला कंपनीतील कामगारांसह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र इंजिनिअरिंग उद्योग कामगार संघटना (सीटू संलग्न) क्लासिक व्हील युनिटच्या फलकाचे अनावरण करून कार्यक्रमाची दिमाखदार सुरुवात करण्यात आली. सी.आय.टी.यू.चे जिल्हा समन्वयक कॉम्रेड प्रवीण सोनवणे यांनी गेल्या काही काळापासून या कारखान्यातील कामगारांशी सातत्याने संवाद साधत त्यांना ‘सीटू’ संघटनेचे महत्त्व पटवून दिले होते. त्यांच्या याच प्रभावी पुढाकारामुळे आणि मार्गदर्शनामुळे क्लासिक व्हील्समध्ये या नव्या युनियनची स्थापना यशस्वीपणे होऊ शकली.
शाखा अनावरणानंतर कॉ. संदीप,महेश आणि सोमनाथ यांनी कामगार चळवळीतील संघर्षशील व प्रेरणादायी गीते सादर करून उपस्थितांमध्ये लढाऊ चेतना जागवली. त्यांच्या गीतांना उपस्थित कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
जागतिक भांडवलशाही आणि श्रमसंहितेविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना कॉ. श्रीकांत फोपसे यांनी आजच्या आंतरराष्ट्रीय राजकीय व आर्थिक परिस्थितीचे सखोल विश्लेषण केले. जागतिक स्तरावर भांडवलशाहीच्या वाढत्या आक्रमणाचा परिणाम भारतातील कामगारांवरही होत असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारने लागू केलेल्या चार श्रमसंहितांमुळे कामगारांचे ऐतिहासिक श्रम अधिकार, नोकरीची सुरक्षितता, संघटना बांधण्याचा अधिकार आणि सामाजिक सुरक्षा कशी धोक्यात आली आहे, हे स्पष्ट केले. या परिस्थितीत जात, धर्म, भाषा आणि प्रांताचे भेद विसरून सर्व कामगारांनी संघटित होऊन संघर्षाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
*एकीच्या बळावरच लढा यशस्वी होईल:कॉ. डॉ. महेबूब सय्यद* यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कामगारांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी निर्धाराने आणि एकीच्या बळावर लढा उभारला पाहिजे. सी.आय.टी.यू.ने स्थापनेपासून वेतन, सुरक्षितता, सामाजिक सुरक्षा, कंत्राटीकरण आणि कामगार कायद्यांच्या प्रश्नांवर सातत्याने संघर्ष केला असून पुढेही हा संघर्ष सुरूच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. संघर्षशील, लोकशाहीवादी आणि वर्गीय दृष्टीकोनातून काम करणारी संघटना हेच सी.आय.टी.यू.चे वेगळेपण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विविध कामगार संघटनांचा पाठिंबा आणि शुभेच्छा
*जिल्हा सेक्रेटरी सीटू (कॉ. एकनाथ मेंगाळ) संघटनेची ताकद कामगारांच्या सक्रिय सहभागात आणि एकजुटीत असते, असे सांगत त्यांनी नव्या कार्यकारिणीला मार्गदर्शन केले.
*कॉ. सिद्धेश्वर कांबळे: क्लासिक व्हील्समधील कामगारांनी सी.आय.टी.यू.शी जोडले जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून त्यांनी शाखेला शुभेच्छा दिल्या.
**एम.आर. युनियन (कॉ. किरण वाळके) कामगारांच्या न्याय्य प्रश्नांवर सर्व संघटनांनी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज व्यक्त केली.
*जनशक्ती बांधकाम कामगार संघटना (अध्यक्ष कॉ. संदीप सकट) कारखाना कामगारांच्या संघर्षाला आमचा कायम पाठिंबा राहील. शोषणाविरुद्धच्या प्रत्येक लढ्यात आम्ही खांद्याला खांदा लावून उभे राहू, अशी ग्वाही दिली.
अहमदनगर जिल्हा घरकामगार संघटना (कॉ. सोमनाथ केंजळे) सर्व क्षेत्रांतील कामगारांनी एकत्र येऊन व्यापक संघर्ष उभारण्याची गरज असल्याचे सांगितले.
यावेळी कंपनीच्या वतीने उपस्थित असलेले कंपनीचे एचआर सचिन चंगेडिया यांनी कामगारांना शुभेच्छा देत, आमच्या सोबत सीटू सारखी वैचारिक संघटना जुळल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
संघटनेच्या माध्यमातून संघर्षाचा निर्धार
यावेळी नव्याने स्थापन झालेल्या शाखेचे अध्यक्ष कॉ. महादेव पालवे यांनी कामगारांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. संघटनेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व कामगारांचे आभार मानले आणि कामगारांच्या प्रत्येक न्याय्य प्रश्नासाठी संघटनेच्या माध्यमातून एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला.
सूत्रसंचालन व आभार:
या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत प्रभावी सूत्रसंचालन सी.आय.टी.यू.चे जिल्हा समन्वयक *कॉ. प्रवीण सोनवणे* यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव पालवे (अध्यक्ष),कॉम्रेड राजेश दळवी (उपाध्यक्ष), कॉम्रेड
कॉम्रेड काशिनाथ कुळधरण (शाखा सचिव), कॉम्रेड सुनील हाडवळे (खजिनदार), कॉम्रेड किशोर खाडे (सहसचिव), तसेच लहुजी लोणकर, रमेश गिते, बाळू गायकवाड, सादाब पठाण, विजय जाधव यांच्यासह क्लासिक व्हील्स लिमिटेड युनियन कमिटीचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा