सामाजिक

फेरीवाल्यांना कायमस्वरूपी कापड बाजारातून काढण्याची मागणी

व्यापारी असोसिएशन च्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर दि.१६(प्रतिनिधी)-एमजी रोड मोची गल्ली, घास गल्ली, शहाजी रोड इतर परिसरात महाराष्ट्र शासनाच्या प्राधिकृत परीपत्रकान्वये सदर बाजारपेठेतील भागांवर फेरीवाल्यांना सक्त मनाई असून मात्र या संपूर्ण परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. शहाजी रोडवर एका फेरीवाल्यांनी एका दुकानदाराशी त्याच्या स्वमालकीच्या दुकानासमोर अनधिकृतरित्या असंवैधानिक पद्धतीने अतिक्रमण करत सदर दुकानदाराशी भांडण केले. त्यानंतर सर्व व्यापारी बंधू तसेच त्या दुकानात काम करणारे नोकरदार वर्ग, दुकान मालक, राजकीय पक्ष आणि काही सामाजिक संघटनांकडून प्रचंड निदर्शने झाली. महापालिका अधिकारी प्रत्येक वेळी फेरीवाल्यांवर तात्पुरती कारवाई करतात. आणि फेरीवाला विरोधी पथक जुजबी स्वरूपाची कारवाई करून परत गेल्यावर काही तासातच ते पुन्हा रस्त्यावर येतात व अनधिकृतरित्या त्याठिकाणी पुन्हा त्यांचा व्यवसाय मांडतात. कारवाई पूर्वी फेरीवाल्यांना महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या काही सूत्रांकडून माहीती मिळते आणि ते त्या वेळी रस्त्यावर येत नाही. त्यामुळे झालेली करवाई कागदपत्रांवरच होऊन राहते. एमजीरोड मोची गल्ली आणि शहाजी रोड वरील फेरीवाल्यांवर कडक कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी हटवावे आणि त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करावा आणि त्यांचा माल जप्त करावा. तसेच मनपा प्रशासनाने सार्वजनिक कारणासाठी रस्ता रुंदीकरण केला त्यावेळी व्यापाऱ्यांनी आपली कोट्यवधी रुपयांची मालमत्ता विनाशर्त व विना मोबदला महापालिकेला सहकार्याच्या भावनेतून विनामूल्य काढून टाकली व मागे सरकलो परंतू फेरीवाल्यांना संरक्षण मिळाल्याने आम्हा व्यापाऱ्यांचे बलिदान व्यर्थ गेले. रस्ता रुंदीकरणासाठी आम्ही एकही रुपया घेतला नाही. आम्ही कोट्यावधी रुपयांचा कर भरत आहोत तर फेरीवाले सार्वजनिक उद्देशाच्या रस्त्याचा वापर करून उपद्रव निर्माण करत आहे. त्यामूळे सर्व फेरीवाले यांच्यावर यापुढील काळात कायमस्वरूपी अशी कारवाई न झाल्यास आम्ही आमची मालमत्ता परत मागू आणि कोणतेही कर भरणार नाही असे देखील निवेदनात म्हटले आहे. जोपर्यंत पोलिसांच्या सहकार्याने महानगरपालिका च्या अतिक्रमण विभाग मार्फत सर्व फेरीवाले उठवत नाही फेरीवाल्यांना कायमस्वरूपी हटवले जात नाही तोपर्यंत आम्ही हा लढा लढत राहू व यापुढील काळात शासन दरबारी योग्य पाठपुरावा करून उच्च न्यायालयापर्यंत धाव घेण्याचा मानस व्यापाऱ्यांनी निवेदन देताना याठिकाणी बोलून दाखवला. तसेच केवळ कारवाईचा बडगा उगारला तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल व उपोषणाचा मार्ग देखील अवलंबण्याचा व्यापाऱ्यांचा मानस आहे. त्यामूळे व्यापारी असोसिएशन च्या वतीने संपूर्ण कापड बाजार परिसरातून हॉकर्स वाल्यांना काढून दुसऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, आयुक्त शंकर गोरे, अतिक्रमण विभाग प्रमुख महानगरपालिका अहमदनगर व पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदने देण्यात आले आहे. यावेळी व्यापारी असोसिएशन संघटनेचे ईश्वर बोरा, प्रतीक बोगावत, कुणाल भंडारी महाविर कांक्रिया, संदीप बायड, संभव काठेड, केतन मुथा, ओमप्रकाश बायड, विजय आहेर दीपक खंडेलवाल, सौरभ भांडेकर, रवी किथानी, आदित्य गांधी, विक्रम नारंग, धीरज पोखरणा, विजय गुगळे किरण व्होरा, ऋषी येवलेकर, बंटी डापसे, आदी व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे