देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 27 ऑक्टोबर: ( प्रतिनिधी) : सकल जैन समाजाची आस्था असणाऱ्या पुण्यातील जैन मंदिर व हॉस्टेलची जागा लाटण्याचा अयशस्वी प्रयत्न केला गेला. भाजपचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राजकीय दबाव यासाठी आणला. जागा लाटण्याचा डाव रचणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करा. मंत्री मोहोळ यांना देखील आरोपी करा. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मोहोळ यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे. नगर शहरातील एका बड्या राजकीय नेत्याने जैन मंदिराची जागा हडपली असल्याचा गंभीर आरोप ठाकरे शिवसेनेने केला आहे. लवकरच पुराव्यानिशी या ताबेमारीचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
सकल जैन समाजाच्या वतीने पुणे जैन मंदिर प्रकरणाच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात काळे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रावजी नांगरे, मनोज गुंदेचा, कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विलास उबाळे, युवा सेनेचे आकाश अल्हाट, सामाजिक न्याय सेनेचे विकास भिंगारदिवे, केडगाव शिवसेनेचे किशोर कोतकर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा नंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काळे म्हणाले, हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या ट्रस्टींनी समाजाला अंधारात ठेवून आर्थिक लाभाच्या लालसेपोटी ५८ वर्ष जुन्या मंदिरासह परिसराच्या प्रॉपर्टीचा बेकायदेशीर रित्या लाटण्याचा डाव रचला होता. हजारो कोटींचा भूखंड केवळ ३११ कोटी रुपयांना मोहोळ यांचे लागेबांधे असणाऱ्या गोखले बिल्डरच्या घशात घालण्यासाठी हा आटापिटा सुरू होता. जैन समाजाची जागरूकता, धर्माचे आचार्य, साधू, साध्वी, मुनी यांच्या जागरूकतेमुळे हा अनर्थ टळला. अहिल्यानगर शहरात देखील जैन समाजाच्या मोक्याच्या जागे बाबत असाच प्रकार घडला आहे. लवकरच त्याचा पुराव्यांसह भांडाफोड करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
काळे पुढे म्हणाले, देशभर संतापाची लाट उसळून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोहोळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली नाही. मुख्यमंत्र्यांनी यावर कोणती ठोस भूमिका घेतली नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल पुण्यात येऊन देखील त्यांनी आंदोलन करणाऱ्या धर्मगुरूंची साधी भेट घेतली नाही. सरकारच्या मंदिर लाटण्याच्या समर्थनार्थ असणाऱ्या भूमिकेचा आम्ही ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा