देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 27 ऑक्टोबर ( प्रतिनिधी): तथाकथित आयटी पार्क, ७७६ रस्त्यांच्या कामांतील घोटाळा मी पुराव्यानिशी बाहेर काढला. म्हणून माझ्यावर बलात्कार, विनयभंग सारखे आयुष्यातून उध्वस्त करणारे खोटे गुन्हे लोकप्रतिनिधींनी दाखल केले. त्यांचे समर्थक मला सोशल मीडिया वर सतत बलात्कारी म्हणत ट्रोल करतात. त्यांना मी भीक घालत नाही. मी कोणाचाही बलात्कार, विनयभंग केला नाही. हे मी नाही तपासा अंती पोलिसांनी म्हटल आहे. माझ्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध मी मे.उच्च न्यायालया मार्फत गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी केले आहे.
मी तीन दिवस पोलीस लॉकअप, एकतीस दिवस तुरुंगामध्ये प्रचंड यातना भोगल्या. भ्रष्टाचाऱ्यांच बिंग फोडल्याची मोठी किंमत मोजली. नगरकरांसाठी बोलणारा माझा आवाज दाबण्यासाठी ते माझी हत्या ही करू शकतात, असा गंभीर आरोप किरण काळेंनी केला आहे. देश, समाजासाठी लढणाऱ्या महात्मा गांधी, नरेंद्र दाभोळकर, गौरी लंकेश यांचीही हत्या केली होती. सावित्रीमाई, महात्मा फुलेंना समाजकंटकांनी त्रास दिला. मी तर सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकर हे माझे आदर्श आहेत. मी जीवाची पर्वा करत नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत अहिल्यानगरकरांसाठी लढत राहील. मला पुन्हा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा दावा काळे यांनी केला आहे.
अजित पवार राष्ट्रवादी, भाजप ट्रोलर्सचा काळे यांनी खरपूस समाचार घेतला. काळे म्हणाले, माझ्यावर विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला गेला. त्यासाठी तीन मंत्र्यांनी फोन केले. त्याचा तपास पूर्ण झाला. पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात स्पष्ट म्हटले आहे की, मी असा कोणताही गुन्हा केलेला नाही. फिर्यादीने द्वेष भावनेने काळेंना त्रास होण्याच्या उद्देशाने खोटी फिर्याद दिली. खोटी फिर्याद दिली म्हणून फिर्यादी विरुद्ध भादवी कलम १८२ व २११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची शिफारस पोलिसांनी मे. न्यायालयाकडे केल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.
मला बलात्कारी म्हणत हिणवले :
पोलिसांनी बलात्काराचा खोट्या गुन्हात जेल मध्ये डांबण्यासाठी मला सबजेलला नेले. तेव्हा सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांच्या टोळक्याने तिथे मला बलात्कारी म्हणून हिणवले. पोलिसांसमोर धुडगूस घातला. माझा आणि फिर्यादीचा कधी संपर्कच झालेला नाही. पोलिसांनी न्यायालयात तसे लेखी म्हणणे सादर केले आहे. प्रभू श्रीरामांची शपथ घेऊन सांगतो, मी बलात्कार केलेला नाही. याची न्यायालयीन लढाई मी शेवटपर्यंत लढणार आहे. मी एका आदर्श शिक्षकेचा मुलगा आहे. महिलांवर अत्याचार करणे, ताबेमारी, उद्योजक, व्यापाऱ्यांचे शोषण, गुन्हेगारी टोळ्या पोसणे, दोन नंबरचे धंदे चालवणे असे माझ्यावर संस्कार नाहीत, असे काळे यांनी म्हटले आहे.
त्यांना तुरुंगात जावे लागेल :
ज्या टोळ्यांनी सुपाऱ्या घेऊन माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले त्यांना तुरुंगात जावे लागेल. भादवी कलम २११ प्रमाणे कायद्यात तशी तरतूद आहे. त्यांना सात वर्षापर्यंतचा कारावास भोगावा लागेल. आता यातून त्यांची आणि त्यांच्या म्होरक्यांची सुटका नाही. त्यासाठी ज्येष्ठ तज्ञ वकिलांचे मी मार्गदर्शन घेतले आहे. मी उच्च न्यायालया मार्फत त्या टोळ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.
ते नगरचे मुंडे, त्यांचे समर्थक नगरचे कराड :
या शहरातील सत्ताधारी हे अहिल्यानगरचे धनंजय मुंडे आहेत. तर त्यांचे समर्थक हे नगरचे वाल्मीक कराड आहेत. दहशत, गुंडगिरीमुळे अन्याय, शोषण होऊन देखील सर्वसामान्य माणूस, व्यापारी, उद्योजक हे पोलीस स्टेशन पर्यंत जाऊ शकत नाही. याचाच गैरफायदा मस्तवाल लोकप्रतिनिधी घेत आहेत. पापाचा घडा भरला की राक्षसी प्रवृत्तींचा सर्वनाश होत असतो. नगरकर सुज्ञ आणि संयमी आहेत. योग्य वेळी अपप्रवृत्तींना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाहीत, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा