ब्रेकिंग
पिंपळगाव तुर्क मध्ये अखेर दोन दिवसानंतर पुन्हा दोन बिबटे पिंजऱ्यामध्ये अडकले

-
देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क पारनेर दि.26 -(तालुका प्रतिनिधी)
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क हे गाव व परिसर डोंगरी भागात असल्याने बिबट्यांचा मुक्त संचार होताना दिसत आहे. मागील काही वर्षांपासून या परिसरात बिबट्यांची संख्या वाढत चालली आहे.
काल वनविभागाच्या पिंजऱ्यात दोन बिबटे अडकले असून अजूनही एक बिबट्या त्याच ठिकाणी पिंजऱ्याच्या भोवती गिरट्या घालत आहे.

या परिसरामध्ये बिबट्यांचे कायमस्वरूपी वास्तव्य असल्याने त्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.अजूनही अनेक बिबटे या परिसरात मुक्तपणे संचार करीत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी काल पकडलेल्या दोन्ही बिबट्यांना गाडीमध्ये टाकून पुढील कार्यवाहीसाठी घेऊन गेलेले आहेत.

त्यांचा जन्म इथंच झालेला असल्यामुळे ते याच परिसरात पुन्हा येण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे जवळ न सोडता त्यांना दूर सह्याद्रीच्या रांगांमध्ये सोडण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते सावकार शिंदे यांनी केलेली आहे. गावातील सर्व नागरिक व रात्रंदिवस शेतात काम करणाऱ्या माता भगिनी या घटनेमुळे भयभीत झालेले आहेत .

सरपंच सौ सोलोचनाताई शिंदे,उपसरपंच इसाक शेख, सर्व ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्री सावकार शिंदे यांनी तत्परतेने वनविभागाशी संपर्क करून पिंजरा मागविल्यामुळे आणि वनविभागाने तात्काळ सहकार्य केल्याने कन्हेर ओहळ परिसरात दोन दिवसांपूर्वी एकाच पिंजऱ्यामध्ये दोन तर काल सुद्धा एकाच पिंजऱ्यामध्य दुपारी 4:30 च्या दरम्यान दोन बिबटे जेरबंद झालेले आहेत.



