कुक्कुटपालनामुळे महिलांचे आर्थिक सबलीकरण शक्य: डॉ. प्रमोद रसाळ
कुक्कुटपालन जोड धंद्याकडे सोन्याची कोंबडी म्हणून पहा

राहुरी / प्रतिनिधी — ग्रामीण भागातील महिलांनी कुक्कुटपालनाकडे व्यवसाय म्हणून बघावे. व्यवसाय वृद्धीसाठी योग्य त्या उपाययोजनांचा वापर केल्यास कुक्कुटपालनातून महिलांचे आर्थिक सबलीकरण शक्य असल्याचे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कृषी विस्तार व संज्ञापन विभाग व पदव्युत्तर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाश्वत उत्पादन आणि वर्धित पोषण व उपजीविका सुरक्षेसाठी परसबागेतील कुक्कुटपालन या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून डॉ. प्रमोद रसाळ बोलत होते. यावेळी हळगाव कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, कृषी विस्तार विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. सुभाषचंद्र शिंदे उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. रसाळ मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, कुक्कुटपालन हा फायदेशीर जोडधंदा असून त्यामुळे महिलांना घरखर्चासाठी मोठी मदत होते. चार पैसे गाठीशी असतील तर आर्थिक अडचणींमध्ये त्याचा मोठा फायदा कुटुंबाला होऊ शकतो. कुक्कुटपालन जोड धंद्याकडे सोन्याची कोंबडी म्हणून पहा व विद्यापीठाकडून मिळालेल्या कोंबड्यांमध्ये वृद्धी करून आपला व्यवसाय वाढवा असे आवाहन त्यांनी यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांना केले. डॉ. मिलिंद अहिरे यांनी ्रास्ताविकामध्ये प्रशिक्षणाचा उद्देश विशद केला. या प्रशिक्षण कार्यक्रमात सकाळच्या सत्रात झालेल्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये डॉ. विष्णू नरवाडे यांनी कुक्कुटपालनातील शाश्वत उत्पादन व वर्धित पोषण तसेच परसबागेतील कुक्कुटपालनाचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रामध्ये प्रशिक्षणार्थींना विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरील कुक्कुटपालनाच्या युनिटला भेटीद्वारे माहिती देण्यात आली. प्रशिक्षणार्थी महिलांना यावेळी प्रत्येकी पाच पक्षी व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी राहुरी तालुक्यातील वरवंडी या गावातील २० महिला प्रशिक्षणार्थी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. गोरक्ष ससाणे यांनी मानले. या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी डॉ. मनोहर धादवड, डॉ. ज्ञानदेव फराटे, राजू राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले.