प्रशासन सर्वसामान्य नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे काय ? एनएचआयएच्या अधिकाऱ्यांना किरण काळे यांनी धरले धारेवर ; उड्डाणपुलावर अपघातांची मालिका थांबेना, काळेंनी नागरिकांच्या मदतीने केले स्वतः बॅरीगेटिंग

अहिल्यानगर दि. 18 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : शुक्रवारी सकाळच्या प्रहरात पुन्हा एकदा बहुचर्चित उड्डाणपुलावर अपघात झाला आहे. अपघातांची मालिका काही थांबायचे नाव घ्यायला तयार नाही. यावेळी एक मोठा ट्रक नेहमीच्या धोकादायक अपघाती वळणावर संरक्षक कठड्यांना धडकल्याने त्याचा मलबा खाली कोसळला. सुदैवाने त्यावेळी खाली कुणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. घटना समजताच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे तात्काळ घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी एनएचआयएच्या अधिकाऱ्यांशी तातडीने मोबाईल वरून संपर्क करत त्यांना चांगलेच धारेवर धरले. प्रशासन सर्वसामान्य नागरिकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे काय ? असा संतप्त सवाल यावेळी त्यांनी केला. फोन केल्यानंतर सुमारे अर्धा तास प्रशासन तिथे न पोहोचल्यामुळे काळे यांनी स्वतः नागरिकांच्या मदतीने पुढील अपघात टाळण्यासाठी बॅरीगेटिंग केले.
त्यानंतर काही वेळाने एनएचआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर काम सुरू झाले. अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे हे सकाळी घटनास्थळा जवळून जात असताना त्यांनी हा प्रकार पाहताच काळे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर उजागरे, शहर काँग्रेस सरचिटणीस अभिनय गायकवाड आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मदतकार्यासाठी त्या ठिकाणी गोळा झाले. यावेळी काळे यांनी सातत्याने होत असणारा या प्रकारां बद्दल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. काळे म्हणाले की, वारंवार या पुलावर अपघात होत आहेत. आतापर्यंत असंख्य वेळा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडे काँग्रेसने तक्रार केली आहे. घटना घडली की नागरिकांचे फोन आम्हाला येतात. आम्ही तात्काळ त्या ठिकाणी मदत करण्यासाठी पोहोचतो. प्रशासनाशी संपर्क साधतो. ते ही त्यावेळी कार्यवाही करण्याचे गोड गोड आश्वासन देतात. मात्र नंतर त्याबाबत कोणती ही कार्यवाही होत नाही. जवळच शाळा, शासकीय कार्यालये आणि नागरिकांची वाहतूक मोठ्या प्रमाणावर या रस्त्याने पुला खालून होत असल्यामुळे नागरिकांच्या जीवितालाच अशा घटनांमुळे मोठा धोका असल्याचे काळे म्हणाले.
किरण काळे पुढे म्हणाले की, यापूर्वी देखील खा. डॉ. निलेश लंके यांच्या समवेत या उड्डाणपुलाची पाहणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करत दुरुस्तीच्या सूचना केल्या होत्या. मात्र अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असून काही लोक यात राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे. हा काही राजकारणाचा विषय नसून शहरातला पहिला आणि एकमेव उड्डाणपूल आहे. मात्र याचा उपयोग कमी आणि सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काम निकृष्ट झाले असून यात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. अधिकारी, ठेकेदार या कामाचे श्रेय घेणारे तथाकथित नेतेमंडळी सगळ्यांचेच यात संगनमत आहे. कामाचे श्रेय घेण्यासाठी फोटोसेशन करायला तत्कालीन खासदार, आमदार पुढे होते. मात्र आता मदत कार्यासाठी आणि यातील दोष दूर करण्यासाठी मात्र ते पुढे यायला तयार नसल्याची टीका काळे यांनी केली आहे.
“त्या” तीन उड्डाणपूलांचे पुढे काय झाले ? :
याच वर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात नगर शहरातील डीएसपी चौक, नागपूर एमआयडीसी जवळील सह्याद्री आणि सन फार्मा चौका जवळ आशा तीन दुपदरी उड्डाण पुलांच्या कामांचा पालकमंत्री यांच्या हस्ते, शहर लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. सदर कामांची निविदा, कुठली ही वर्क ऑर्डर नसतानाही शुभारंभ करत नगरकरांची दिशाभूल करत फसवणूक केली गेली. त्या तीन उड्डाणपुलांचे पुढे काय झाले ? असा सवाल किरण काळे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. ती कामे सुरू करताना आता तरी त्यामध्ये कोणी पैसे खाऊ नका. भ्रष्टाचार करू नका, असा टोला लगावत काम दोष रहित होईल याची सर्वतोपरी खबरदारी घ्या असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.