आरोग्य व शिक्षण

सैनिकांसाठी जिल्हा प्रशासन राबविणार ‘अमृत* *जवान *सन्मान अभियान

प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी 'अमृत जवान* *सन्मान दिन'*

  • अहमदनगर, दि.3 (प्रतिनिधी )- जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटूंब व कार्यरत सैनिक यांचे विविध विभागातील शासकीय कामे जलदरित्या व प्राधान्याने निपटारा करण्यासाठी येत्या 7 फेब्रुवारी पासून ‘अमृत जवान अभियान’ राबविण्यात येणार आहे. 23 एप्रिल 2022 पर्यंत 75 दिवसाच्या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. लोकशाही दिनाच्या धर्तीवर प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित केला जाणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली आहे.
    सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावून निःस्वार्थीपणे देशाची सेवा केली आहे व करत आहेत. त्यांची सेवा व समर्पण विचारात घेता त्यांचे मनोबल उंचावणे व  उचित सन्मान करण्यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून हे अभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
    अहमदनगर जिल्हयात 15000 पेक्षा जास्त माजी सैनिक असून, माजी सैनिकांच्या विधवांची संख्या जवळपास 3000, तसेच शहीद सैनिकांच्या कुटुंबांची संख्या 50 आहे. माजी सैनिकांवर अंदाजे 50000 कुटुंबीय अवलंबून आहेत. तसेच मूळ वास्तव्य या जिल्हयातील असलेले आणि सद्यस्थितीत भारतीय सेनेत जसे भूदल, नौदल व हवाईदल मध्ये कार्यरत असलेले आणि इतर निमलष्करी दलांमध्ये कार्यरत असलेल्या सैनिकांची संख्या देखील मोठी आहे.
    सीमेवर तैनात असल्याने व स्वग्रामपासून दूर असल्याने सैनिकांची प्रशासनात अनेक कामे पाठपुराव्या अभावी अथवा वेळेअभावी प्रलंबित असतात. पाठपुरावा करण्यासाठी माहितीगार मनुष्य नसल्याने प्रलंबित राहतात.  जिल्हा प्रशासनाच्या वतीने  सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ‘अमृत जवान सन्मान अभियान 2022’ राबविण्यात येईल. प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित करुन लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभाग प्रमुख सैनिक अर्जदार यांचे उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेतला जाणार आहे.
    या अभियानाची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती व तालुकास्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. प्रत्येक शासकीय विभागाने  तालुका व जिल्हास्तरावर हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.  या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक खिडकी कक्ष या तत्वाप्रमाणे सहाय्यता कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. या कक्षात दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत कार्यरत सैनिक, माजी सैनिक व त्यांचे निकटवर्तीय यांचे विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्विकारण्यात यावेत. अर्जाचे विभागनिहाय वर्गीकरण करुन संबंधित विभागांकडे ते अर्ज त्याच दिवशी पाठवावेत. या माध्यमातून शासनाच्या इतर सर्व विभागाकडे सैनिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा केला जाणार आहे.  तालुकास्तरीय समितीची बैठक 7 दिवसातून एकदा आयोजित केली जाईल. या अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे.
    या अभियानात अहमदनगर जिल्ह्यातील महसूल,  पोलीस,  ग्रामविकास,  कृषी,  नगरविकास,  परिवहन, सहकार आदी विभागासह सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदवावा. तसेच जास्तीत जास्त सैनिकांनी आपल्या प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे प्राप्त करून घेण्यासाठी अभियानात सहभाग नोंदवावा. असे आवाहन ही जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे