श्रीगोंदा तालुक्याच्या गटविकास अधिकारी राणी फराटे यांची बांधखडक शाळेला भेट विविध गुणदर्शन स्पर्धेत तब्बल १४ बक्षिसे जिंकणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा केला गौरव जामखेड पं.स.चे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी केले विशेष अभिनंदन

जामखेड दि. 4 जानेवारी (प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या स्व.आर.आर.(आबा)पाटील सुंदर गाव योजनांतर्गत विविध शासकीय उपक्रम तसेच लोकसहभागातील कामांची पाहणी करण्यासाठी मंगळवार दि.२जानेवारी २०२४रोजी श्रीगोंदा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी राणी फराटे यांनी बांधखडक शाळेला भेट दिली.यावेळी नुकत्याच शिऊर येथे संपन्न झालेल्या केंद्रस्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेत वक्तृत्व,कथाकथन,वैयक्तिक गायन,सुंदर हस्ताक्षर,वेशभूषा सादरीकरण,समूहगीत गायन व सांस्कृतिक (नृत्य ,नाट्य) या स्पर्धांत विविध गटांतून प्रथम क्रमांकाची ६, द्वितीय क्रमांकाची ६ आणि तृतीय क्रमांकाची २ अशी तब्बल १४ बक्षिसे जिंकणा-या बांधखडक शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा श्रीम.फराटे यांनी सत्कार करत त्यांच्याशी सुसंवाद साधला व शाळेचे अभिनंदन केले.
यावेळी श्रीगोंदा पं.स.च्या विस्तार अधिकारी सारिका हराळ,जामखेड सहायक गट विकास अधिकारी कैलास खैरे,विस्तार अधिकारी बापूराव माने व सिद्धनाथ भजनावळे ,शिऊर ग्रा.पं.चे ग्रामसेवक सुभाष शिंदे ,बांधखडकचे सरपंच राजेंद्र कुटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय वारे ,ग्रामसेविका स्वाती पटेकर,ग्रामरोजगार सेवक धनाजी फुंदे इ.मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे अप्रतिम सादरीकरण पाहून जामखेड सहायक गटविकास अधिकारी कैलास खैरे व पं.स.विस्तार अधिकारी सिद्धनाथ भजनावळे यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी १०००रू.रोख बक्षीस दिले.
सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विकास सौने यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन उपाध्यापक मनोहर इनामदार यांनी केले.
बांधखडक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन स्पर्धेत मिळविलेल्या अभूतपूर्व यशाबद्दल जामखेड तालुक्याचे कार्यक्षम गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे ,खर्डा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी केशव गायकवाड व जामखेड बीटचे शिक्षणविस्तार अधिकारी तथा नायगावचे केंद्रप्रमुख सुरेश मोहिते यांच्यासह बांधखडक ग्रामस्थांनी शाळेतील सर्व विद्यार्थी,शिक्षक व पालकांचे विशेष अभिनंदन केले.