प्रशासकिय

जिल्ह्यात मोहरम सण शांततामय वातावरणात साजरा करा- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी कार्यालयात शांतता समितीची बैठक संपन्न

अहमदनगर, दि. 12 जुलै (जिमाका):- जिल्ह्यात होणारे सण, उत्सव शांततेमध्ये व आनंदात साजरे करण्याची आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे. ही परंपरा कायम ठेवत मोहरम सण शांततामय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मोहरम सणानिमित्ताने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रंसगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, महानगर पालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, पोलीस उपअधीक्षक अमोल भारती, महानगरपालिकेचे उपायुक्त सौभव जोशी यांच्यासह शांतता समितीचे, उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री सालीमठ म्हणाले की, शांतताप्रिय उत्सव साजरा करणारा जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याचा नावलौकिक आहे. सणादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार न घडता अत्यंत शिस्तबद्धरितीने व शांततेच्या वातावरणामध्ये सण साजरा करण्याची जबाबदारी उत्सव समितीमधील पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी आहे. सर्वांनी एकत्र येत हा सण अत्यंत आनंदाने व शांततेमध्ये साजरा करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केले.
आषाढी वारीसाठी पंढरपुर येथे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी प्रशासनामार्फत अनेक सोई-सुविधा गतवर्षापासुन उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोहरम सणासाठी नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा प्रशासनामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील. मोहरम सणानिमित्ताने मिरवणुक मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती करुन घेण्यात यावी. तसेच मार्गावर आवश्यक ती विद्युत व्यवस्था करण्यात यावी. मोबाईल शौचालय, पिण्याचे पाणी यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिले.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला म्हणाले की, मोहरम सण कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून शांततामय वातावरणात साजरा करण्यात यावा. मिरवणुकीदरम्यान डिजेचा वापर करण्यात येतो. ध्वनीप्रदुषणाबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. मर्यादेपेक्षा अधिक डिजेचा आवाज होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. मिरवणुकीमध्ये डिजे ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करण्यात यावा. तसेच मिरवणुकीसाठी ठरवुन दिलेल्या मार्गानेच मिरवणुक काढण्यात यावी. यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बैठकीस उपस्थित शांतता समिती सदस्य व उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही उपयुक्त अशा सुचना केल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे