किरण काळेंची बदनामी केल्याप्रकरणी प्रवीण गीते, राष्ट्रवादीचे अजिंक्य बोरकरच्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर दि. २२ जून (प्रतिनिधी) : शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांची बदनामी करणे प्रवीण शरद गीते व शहराच्या आमदारांचे कट्टर समर्थक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांना चांगलेच महागात पडले आहे. काळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी दंड संहितेच्या कलम १५५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. त्यावरून भादवि ५०० अन्वये बोरकर, गीते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, व्हाट्सअप ग्रुप मध्ये इसम नामे अजिंक्य बोरकर याने “आमदारांना बदनाम करण्याचा डाव. काँग्रेसच्या त्या पदाधिकाऱ्याचीच दहशत, ब्लॅकमेलिंग केले – प्रविण गिते” या मथळाखाली एक पोस्ट टाकलेली मी दि. २२ जून रोजी पाहिली व वाचली. त्याखाली युट्युबची लिंक ईसम नामे बोरकर याने टाकली होती. यामध्ये “काळेंकडून खंडणीची मागणी झाली – प्रविण गिते” असे नमूद केल्याचे मी पाहिले व वाचले.
सदर व्हिडिओमध्ये गीते याने काळे यांनी मला खंडणी मागितल्याचे मी ऐकले. मी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत असून समाजातील अन्याय, दहशती विरोधात तसेच शहर विकासासाठी काम करत आहे. मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा शहर जिल्हाध्यक्ष आहे. मी कुणालाही, तसेच प्रवीण शरद गीते नामे व्यक्तीला खंडणी मागितलेली नाही. तसा माझ्यावर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल नाही. असे असतानाही बदनामी करण्यात आल्यामुळे माझी प्रतिमा मलिन झाली आहे.
यापूर्वी देखील आयटी पार्क भांडाफोड प्रकरणात माझ्याविरुद्ध राजकीय दबावातून विनयभंगाचा खोटा गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा सखोल तपास पोलिसांनी पूर्ण केल्यानंतर संबंधित फिर्याद ही खोटी असल्याचे पोलिस तपासाअंती निष्पन्न झालेले आहे. त्यावेळी देखील माझी अशाच पद्धतीने खोटी बदनामी राजकीय षड्यंत्रातून करण्यात आली होती. त्यामुळे समाज माध्यमांवर खोट्या पोस्ट टाकून बदनामी केल्याबाबत गीते, बोरकर यांच्यावर काळे यांनी गुन्हा दाखल केला आहे.