“समता पर्व” निमित्त सामाजिक न्याय भवनात पत्रकारांसाठी कार्यशाळा संपन्न

अहमदनगर, 29 नोव्हेंबर – सहायक आयुक्त समाजकल्याण व जिल्हा समाजकल्याण कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात ‘समता पर्व’ साजरे केले जात असून याचे औचित्य साधत सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर जिल्ह्यातील पत्रकारांसाठीची कार्यशाळा आज सामाजिक न्याय भवन येथे संपन्न झाली .
यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांच्यासह विविध वृत्तपत्रांसह इलेक्टॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यशाळेत पत्रकारांशी संवाद साधताना सहायक आयुक्त राधाकिसन देवढे म्हणाले की , 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत विविध उपक्रमाने समता पर्व साजरे केले जात आहे. यामध्ये जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविदयालये, सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, लेखी परीक्षा, वकृत्व स्पर्धा, ‘संविधाना’वर व्याख्यान, ‘संविधान’ या विषयावर भिंतीपत्रक, पोस्टर्स, बॅनर इ. बाबत चित्रकला स्पर्धा व अनुसूचित जाती घटकासाठी कार्य करणारे समाजसेवी कार्यकर्ते, प्रतिनिधी, कर्मचारी यांची ‘अनुसूचित जाती उत्थान : दशा आणि दिशा’ या विषयावर कार्यशाळा तसेच युवा गटाची कार्यशाळा, अनूसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी, जात प्रमाणपत्र पडताळणी शिबिर, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तृतीयपंथीय यांच्यासाठी कार्यशाळा, ‘संविधान’ विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रमांनी हे समतापर्व साजरे केले जात असून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप, बक्षिस वितरणाने याचा समारोप करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागस प्रवर्गाचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास करण्याच्यादृष्टीने अनेकविध योजनांच्या माध्यमातून काम करण्यात येते. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत असलेली सर्व कार्यालये एकाच छताखाली यावीत या उद्देशाने सर्व सोईंनी युक्त अशा सामाजिक न्याय भवनाची उभारणी करण्यात आली असल्याचे सांगत या योजनांचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून माहिती सर्वदूर पोहोचविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्यांच्या शंकांचे निरसनही श्री देवढे यांनी केले.