‘जात वैधता प्रमाणपत्र’ शिबिरांचा लाभ घ्यावा – समिती सदस्या अमीना शेख महाविद्यालयांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन

अहमदनगर, २९ नोव्हेंबर – ११ विज्ञान व १२ विज्ञान शाखेमधील प्रवेशीत सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्रा’अभावी ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा ’मंडणगड पॅटर्न‘ च्या धर्तीवर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विद्यार्थ्यांना ‘जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहाय्य आणि ‘जातवैधता प्रमाणपत्र’ वाटपासाठी महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा घेत आहे. या शिबिरांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन अहमदनगर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्या तथा उपायुक्त अमीना शेख यांनी आज येथे केले.
सामाजिक न्याय विभागाच्या वतीने ‘संविधान दिन’ २६ नोव्हेंबर ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत ‘समता पर्व’ साजरे केले जात आहे. यानिमित्ताने अहमदनगरच्या न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात ११ वी व १२ वी विज्ञान विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करतांना श्रीमती अमीना शेख बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.झावरे, उपप्राचार्य श्री.कळमकर, प्राध्यापक श्रीमती दारकुंडे, श्री.सावळे उपस्थित होते.
श्रीमती अमीना शेख म्हणाल्या, राज्याचे समाजकल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ नुसार महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र” वितरित करण्याच्या सूचना केल्या आहेत. या नुसार अहमदनगर जिल्ह्यात काम करण्यात येत आहे.
जात प्रमाणपत्र वितरित करण्याचे काम ‘महसूल विभाग’ करत असते. आणि त्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याचे काम जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या करतात. मात्र अनेक विद्यार्थ्यांकडे ‘जात प्रमाणपत्र’ उपलब्ध नसते. त्यामुळे त्यांच्या जातीची पडताळणी करणे जिकिरीचे होते. आता समाज कल्याण विभागाच्या या समित्या प्रांतधिकारी यांच्याशी संपर्क साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार आहेत. असेही श्रीमती शेख यांनी याप्रसंगी सांगितले.
श्रीमती शेख म्हणाल्या, विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच ”जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र”मिळवून देण्यासाठी जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिबिरे घेण्यात येत आहेत. ‘जात प्रमाणपत्र’ व ‘जात वैधता प्रमाणपत्र’ मिळविण्यासाठी कशा प्रकारे अर्ज करावा व त्यासाठी कोणते दस्ताऐवज जोडावेत, जाती दावा सिध्द करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व पुरावे इत्यादीबाबत श्रीमती शेख यांनी यावेळी मार्गदर्शन केले.