चौंडी येथे ३१ मे रोजी ‘अहिल्यादेवी जागर स्त्री शक्तीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम
सांस्कृतिक संचालनालयाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन

अहमदनगर, २८ मे (प्रतिनिधी):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे २०२२ रोजी चौंडी (ता. जामखेड) येथे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘अहिल्यादेवी जागर स्त्री शक्तीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
अहिल्यादेवींनी केलेले सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व इतर कार्य यांचा गुणगौरव करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ३१ मे २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध गायिका उर्मिला धनगर, अभिजित कोसंबी (सारेगमप विजेता), लोकशाहीर, पारंपरिक गोंधळ कला जोपासणारे व मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे प्रमुख प्रा. गणेश चंदनशिवे यांचा पारंपरिक गोंधळचा कार्यक्रम होणार आहे. ‘जय मल्हार’या सुप्रसिदध मालिकेतील खंडेरायाची भूमिका साकारणारे अभिनेते देवदत्त नागे तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित पुण्यश्लोक अहिल्याबाई मालिकेतील अहिल्याबाईंच्या बालपणीची भूमिका साकारणारी मराठमोळी बालकलाकार अदिती जलतरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शाहिरी परंपरेतील एक सुप्रसिदध शाहीर देवानंद माळी यांचा शाहिरी /पोवाडयाचा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ५० कलाकारांची धनगरी ढोल तसेच झांज वादनाने मानवंदना होणार असून १५ हलगी व १५ संबळ वादनाची तालबद्ध जुगलबंदी होणार आहे. सदरील कार्यक्रम हा सर्व प्रेक्षक व उपस्थितांसाठी विनामूल्य असून प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.