ब्रेकिंग

साठे सरांनी दिली जीवनाला कलाटणी:पो. नि.मारुती भोरे

जागतिक पुस्तक दिनानिमित्त विशेष वास्तवदर्शी लेख

अहमदनगर दि.२३ (प्रतिनिधी) आई वडील मुलांना जन्म देतात त्यांना जग दाखवतात.वास्तविक पाहता लहान मुले हे चिखलाचे गोळे असतात.पण त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून आकार देण्याचे काम शिक्षकच करत असतात.त्यामुळे त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळत असते. सद्या नागपूर येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मारुती भोरे या विद्यार्थ्याने प्रा.विलास साठे सरांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या जीवनाला कशी कलाटणी मिळाली.जागतिक पुस्तक दिनानिमित्त सादर केलेला विशेष लेख!

वरील फोटो आहे 1989/90 चा जेव्हा मी आठवीत होतो ज्याच्या सोबत मी उभा आहे ते माझे वर्गशिक्षक श्री विलास साठे सर .

आता आपण अजून थोडे मागे जाऊ पहिली ते चौथी माझे शिक्षण झाले ते जिल्हा परिषद शाळा सौताडा ता. पाटोदा जिल्हा बीड . वडील नगर मध्ये हमालीचे काम करत होते. ते आम्हाला नगरला घेऊन आले. मला पाचवी मध्ये शाळेत नाव टाकण्यासाठी धडपड करत होते त्यावेळी गोपाळ नावाचे काका (दिवाणजी म्हणुन आडते बाजारात काम करीत होते) मदतीला धावून आले त्यांनी माझे नाव दादा चौधरी शाळेत टाकले . शाळा लई मोठी म्हणजे तीन मजली दगडी इमारत गोल गोल कमानी, बसायला लाकडी बेंच, कारण चौथी पर्यन्त गावात आम्ही शेणाने सारवलेल्या जमिनीवर बसायचो. त्यामुळे बेंच, भिंतीत मोठा काळा फळा, मोठा वर्ग सर्व काही नवीन लईच भारी वाटायच. शाळा सुरू झाली, नवीन मित्र झाले परंतु ते गावा सारखे नव्हते त्याची भाषा शुद्ध होती माझ्या शब्दाला ते हसत असत. जसे कोरड्यास, दप्तर, चड्डी, सदरा किवा खमिस ,वाहना असे बरेच शब्द होते. पाचवी तुकडी ब ला वर्गशिक्षक होते श्री विलास साठे सर ते आम्हाला गणित शिकवत,रोज गृहपाठ देत गणित सोडवून आणायला सांगत नाही आणले किवा चुकले की ते पाच पाच छड्या उलट्या हातावर मारायचे ,त्याचा मार आणि भीती इतकी मनात बसली की मी एक महिन्या नंतर शाळेतच गेलो नाही. रोज तयार होऊन शाळेला म्हणुन निघायचो आणि सिद्धी बागेत व जवळच महादेवाच्या मदिरा समोर घसरगुंडी किवा आणखी काही खेळत बसायचो संध्याकाळ झाली की घरी जायचो. वडील आडते बाजारात रात्री आठ नऊ पर्यन्त, आई दुसर्‍या च्या घरी धुणीभांडी करायची. दोन्ही अडाणी माझ्या कड त्याच लक्ष इतकच की पोरग रोज न चुकता शाळेत जातय. असेच चार पाच महिने निघून गेले. माझी शाळा सिद्धी बागेतच भरत होती. एक दिवस साठे सर भर उन्हात सायकल वर माझ घर शोधत घरी आले. माझा पत्ता होता, पुनम मोती नगर, मार्केटयार्ड मागे,नवजीवन कॉलनी म्हणजे आताची चैतन्य कॉलनी ( त्यावेळी कॉलनीला नाव नव्हते) तेव्हा आम्ही श्री विजय बोंद्रे याच्या पत्र्याच्या शेड मध्ये राहत होतो. भर उन्हात साठे सर दारात उभा लहान बहीण घरी, सरांनी विचारल आई वडील कुठे आहेत तीन सागितले कामाला गेलेत आणि भाऊ शाळेत ते बोलले आईला बोलव, आई आली त्यांनी सांगितले तुमचा पोरगा मारूती, गेली पाच महिने झाली शाळेत नाही येत. आई बोलली तो तर रोज भाकर घेऊन शाळेत जातो. सरांनी सागितले उद्या त्याला घेऊन शाळेत या. संध्याकाळी मी घरी आलो आईनी विचारल आला का शाळेतून मी म्हणालो आलो की, आईचे प्रश्न सुरू झाले आणि माझी खोटी उत्तर आईचा पारा चढला होता. हाता मध्ये चुलीतल लाकूड घेऊन माझ्या पिडरया सडकून काढल्या होत्या. आईला माझ्या खोट्या बोलण्याचा आणि पाच महिने शाळा बुडवलच्या भयानक राग आला होता. ती बोलली बाप तिकड हमाली करतोय आय दुसर्‍याचि धुणीभांडी आणि पोरग फिरतोय नगरात आमच काही जायच नाही तूही असाच बापा सारखाच हमाली करशील. आईला दुःख झाल होत ती रडत होती,तीच स्वप्नं भंगणार अस तिला वाटत होतं. ती नेहमी म्हणायची लोकांची धुणीभांडी करीन पण पोरांना शिकवीन त्याला कारण ही तसच होत वडील जेव्हा बाहेर गावी असत आई गावाकडे तेव्हा वडील 15 पैशाच पत्र दुसर्‍या कडून लिहून आईला पाठवायचे ते पत्र घेऊन आई दुसर्‍या कडे वाचायला घेऊन जायची तेव्हा वाचणारा म्हणायचा आता काम आहे वेळ नाही उद्या वाचू, उद्या उद्या करता करता पंधरा दिवस उलटत तेव्हा त्या पत्रातल्या चार ओळी वाचल्या जाऊन आईच्या कानावर पडायच्या तेव्हा पासून आईला वाटायचे पोरांना शिकवायचे आणि हे पोरग अस नीघल. तिला मनातून दुःख झाल होत. रात्री वडील आले त्यांना पोराचा पराक्रम समजला त्यांनी ही फैलावर घेतले. मी मेल्याहून मेल्या सारखा झालो होतो. दुसर्‍या दिवशी शाळेत सरांनी, मुख्यध्यापक मला सुनावले मुलानी माझी टिंगलटवाळी केली. ते वर्ष वाया गेले होते. माझ्या बरोबर एकूण 16 जण(ब तुकडीतील)नापास झाले होते. आज सर्वाची नावे घेत नाही कारण सर्वजण आजही चांगले मित्र आहोत. परत पाचवी सुरू झाली आणि साठे सरानी माझी परिस्थिती पाहून माझ्याकडे चांगले लक्ष दिले. पाचवी ते नववी पर्यन्त माझ्या कडून शिकवणीचा एक रुपया ही घेतला नाही. मीच काय पण बरेच विद्यार्थी होते त्याच्या कडून त्यांनी फि घेतली नाही. साठे सरांन मुळेच माझी शाळा परत चालू झाली ,आज कोण असा शिक्षक आहे जो एका विद्यार्थ्या साठी त्याचा पत्ता शोधत, भर उन्हात इतक्या लांब सायकल वर त्याच्या घरी जाऊन सांगणार की तुमचा मुलगा शाळेत येत नाही. आणि विशेष लक्ष देऊन त्याला विनामूल्य शिकवणी देणारे. धन्य ते श्री विलास साठे सर, सरांना मना पासून साष्टांग दंडवत.
या घटने नंतर पाचवी ते नववी पर्यन्त पहिला नंबर सोडला नाही तसेच पाचवी ते दहावी पर्यन्त क्लास मॉनिटर ही होतो. आमच्या कबड्डी टीमने पाचवि ब या तुकडीने दहावी पर्यन्त कधी हार पाहिली नाही. या टीमचा कॅप्टन ही मीच होतो.

मी आठवीत असताना कबड्डीचा कप जिंकला होता. माझी इच्छा होती की माझे वर्गशिक्षक साठे सरा सोबत एक फोटो काढावा,मी सरांना विचारले ते हो म्हणाले. आता सारखे मोबाईल, कॅमेरा नव्हता त्यावेळी studio मध्ये जाऊन फोटो काढावा लागे.मी वडिलांना सागितले वडील बोलले उद्या तू आणि सर बाजारात या मी पैसे घेऊन देईल तेव्हा तुम्ही फोटो काढा.
शनिवारी दुपारी साठे सरांना आडते बाजारात बोलवल तेही सायकल घेऊन आले वडिलांनी शेटजी कडून 50 रुपये घेतले आणि मला दिले. वडील बोलले फोटो काढल्यावर गुरुजींना लस्सी पाज. मी तो जिंकलेला मोठा कप घेऊन सराच्या मागे सायकल वर बसलो, सरांनी मला डब्बलशिट आडते बाजार ते चितळे रोड फोटो शॉप पर्यन्त नेले. चितळे रोड वर लस्सीच दुकान आणि फोटोच दुकान शेजारी च होते आज दुकानाचे नाव आठवत नाही. आम्ही फोटो काढला. पोस्टकार्ड साईज तीन कॉपी 35 रुपये. शेजारीच लस्सी दुकानात पाच पाच रुपयाची लस्सी पिलो. साठे सरा सारखे फार थोडे शिक्षक असतात जे विद्यार्थी साठी इतक करतात.
ही होती फोटो चि गोष्ट, आज बरेच जण साठे सरांना ओळखत असतिल किवा त्याचे विद्यार्थी राहिले असतिल. पुन्हा एकदा सरांना व सर्व गुरुवर्यना साष्टांग दंडवत नमस्कार 🙏

आपलाच दगडी शाळेचा माजी विद्यार्थी
मारूती भोरे पोलीस निरीक्षक नागपूर

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे