राजकिय

पंतप्रधानांची वक्तव्य देशवासीयांचा भ्रमनिरास करणारी – किरण काळे

अहमदनगर दि. 10 मे (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवून पंच्याहत्तर वर्षांहून अधिक काळ लोटला. त्यानंतर झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांपैकी २०२४ ची निवडणूक ही देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. देशाने अनेक पंतप्रधान पाहिले. निवडणुका पाहिल्या. मात्र यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधानांकडून सातत्याने देशवासीयांची दिशाभूल करणारी वक्तव्य ही तरुण, शेतकरी, महिला, व्यापारी, उद्योजक, कामगार यासाह सर्व धर्मीय व समाज घटकांचा भ्रमनिरास करणारी असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.
भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नगर येथे सभा घेतली. या सभेत काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी म्हटले. याबाबत बोलताना काळे म्हणाले, तुम्ही किती दिवस हिंदू-मुस्लिम करणार आहात ? वास्तविकत: पंतप्रधान नगर शहरात येणार म्हणून नगरकरांना त्यांच्याकडून लोकहिताच, विकासाचं ऐकायला मिळेल अशा अपेक्षा होत्या. त्यावर त्यांनी चकार शब्द काढला नाही. एका सर्वसामान्य कुटुंबातील निलेश लंके यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना यावे लागते हाच लंके यांचा आणि त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या दक्षिणवासीयांचा विजय आहे.
काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा क्रांतिकारी असून त्यामुळे 145 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाच्या बहुतांश लोकांना मोठा फायदा मिळून देशामध्ये मोठे आर्थिक बदल यातून होतील. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील महिलेला वर्षाला एक लाख रुपये, चाळीस वर्षाखालील उद्योग करू इच्छिणाऱ्यांना स्टार्टअप करीता भांडवल पुरवठा योजना, केंद्रातील रखडलेल्या ३० लाख नोकऱ्यांची भरती, प्रसार माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सुरु असलेली गळचेपी दूर करणे, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला आधारभूत किंमत निश्चित करून देणे, देशातील प्रत्येक नागरिकाला २५ लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत देणे, व्यापाऱ्यांची आयकर आणि जीएसटीच्या जाचक आणि क्लिष्ट प्रक्रियेतून सुटका करणे यासह जनकल्याणाच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे याला मुस्लिम लिगचा जाहीरनामा म्हणून तमाम हिंदू बांधवांची दिशाभूल करण्याचे काम पंतप्रधानां सारख्या देशाच्या जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्ती कडून होणं हे खंत वाटावी असे असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.

ती वक्तव्यं पंतप्रधान पदाला न शोभणारी :
काळे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीचे सरकार आल्यास महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेतील, तुमच्याकडे दोन म्हशी असतील तर काँग्रेसवाले एक म्हैस घेऊन जातील, कसाबला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसला हद्दपार करा, देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भटकती आत्मा म्हणून संबोधणे ही देशाच्या पंतप्रधान पदाला न शोभणारी वक्तव्य आहेत. लोकांमध्ये हास्यास्पद ठरत आहेत. या बाबी लक्षात घेतल्यास मोदींना लोकसभेच्या निवडणुकीतील संभाव्य पराभवाची जाणीव झाली आहे असे वाटते.

चौकट :
राष्ट्रवादीच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष किरण काळे यांनी नगर शहरात स्वागत केले. यावेळी ॲड. अशोक कोल्हे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची व शहरातील ढासळलेली कायदा सुव्यवस्था, गुंडगिरीकडे काळेंनी सुळे यांचे लक्ष वेधले. नगर शहर दहशतमुक्त करायचे आहे. शहराचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लढाई लढत आहोत, असे यावेळी काळे म्हणाले. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे