राजकिय

उभा देश म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही:कृषीमंत्री धनंजय मुंडे

शेवगाव दि. 9 मे (प्रतिनिधी)
उभा देश म्हणतोय की देशाला मोदींशिवाय पर्याय नाही. खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर जिल्हा हा देशातील पहिल्या १० प्रगत जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. ते शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील महायुतीच्या प्रचार सभेत बोलत होते.
अहिल्यानगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे महासभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह आमदार मोनिकाताई राजळे, चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, दत्ताभाऊ पानसरे, नंदू मुंडे, अरूण मुंडे, एकनाथ खटाळ, काकासाहेब ननावरे, राहुल देशमुख आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सभेला मार्गदर्शन करताना मंत्री मुंडे म्हणाले की, मोदी साहेब देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होताना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आल्याचा आनंद होत आहे.
२०१४ मध्ये देश दिवाळखोरीत निघाला असताना नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची धुरा सांभाळत १० वर्षात इतके काम केले की, देशाची अर्थव्यवस्था ५ व्या क्रमांकावर आणुन ठेवली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात देशाची इतकी पत आणि प्रतिष्ठा वाढली आहे की, आपल्या देशाबद्दल जर इतर देशातील मंत्रीमडळातील एखाद्या नेत्याने ब्र जरी काढला तरी त्या देशाचा पंतप्रधान त्या नेत्याचा राजीनामा घेतो. आज ही ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. यामुळे जर देश सुरक्षित आणि विकसित ठेवायचा असेल तर मोदींशिवाय देशाला कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी त्यांनी विरोधकांचा सुद्धा चांगलाच समाचार घेतला. त्यांनी सांगितले की, ७० वर्षात ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी केवळ लोकांची फसवणूक केली. तर पंतप्रधान मोदी यांनी ८० टक्के लोकांना मोफत राशन देवून त्यांची भूक भागवली आहे. विरोधी उमेदवारावर बोलताना मंत्री मुंडे म्हणाले की, जो पोलिसांचा बाप काढतो तो उद्या निवडून आल्यावर तुमचा बाप काढायला सुद्धा कमी करणार नाही. पारनेर तालुक्याने जी चुक केली ती चुक आता तुम्ही करू नका असे आवाहन त्यांनी केले.
मुंडे यांनी महायुती आणि मोदी सरकारच्या माध्यनातून शेतकरी, महिला, तरुणांना, औद्योगिक क्षेत्राला विविध माध्यमातून झालेल्या फायद्यांची माहिती देत डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या विकास कामांची माहिती दिली. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली खा. विखेंच्या माध्यमातून नगर जिल्हा देशातील सर्वात विकसित १० जिल्हा म्हणून नावारुपाला येईल अशी खात्री देत येता १३ मे रोजी अनु, क्र. ३ समोरील कमळ चिन्हाचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे