राजकिय

खुनाच्या गुन्हयातील आरोपीच्या दुचाकीवर खा.सुजय विखे ! बाबासाहेब न्याय द्या ! मृत संतोष गायकवाड यांच्या पत्नीची आर्त हाक! आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवरही कारवाईची मागणी

पारनेर दि. 16 एप्रिल ( प्रतिनिधी)
नारायणगव्हाण येथील संतोष बबन गायकवाड यांच्या हत्येच्या गुन्हयातील आरोपी अजिंक्यतारा दरेकर याच्या दुचाकीवर बसून खा. डॉ. सुजय विखे हे रॅलीत सहभागी झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, राजकारणी लोकांचे गुन्हेगारांना पाठबळ मिळत असल्याने मागासवर्गीय समाजाला न्याय  मिळवून देण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या संघर्षाला काहीच अर्थ राहिला नसल्याचे सांगत बाबासाहेब तुम्ही परत या मला न्याय मिळवून द्या अशी आर्त हाक मयत संतोष गायकवाड यांच्या पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिली.

संगिता गायकवाड यांनी सांगितले की, मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचे ज्ञान घेतले. अन्यायाविरूध्द लढा दिला. त्यांच्या या लढयाचा आज काही उपयोग होत नसल्याचे दिसत आहे. माझ्या पतीची हत्या झाल्यानंतर त्यांचे मारेकरी काही दिवसांतच कोठडीबाहेर आले. ते आज मोकाट फिरत आहेत. त्यांना राजकारणी लोकांचा पाठींबा आहे हे पाहून अतिशय वाईट वाटते. आज माझे सासू सासरे आंथरूणाला खिळलेले आहेत. पतीची हत्या झाल्यानंतर आमच्यापुढे मोठे संकट उभे असतानाच पतीच्या मारेकऱ्यांपासून आमच्या कुटूंबाला धोका आहे. या आरोपींना तडीपार करण्यात यावे. त्यांना मदत करणाऱ्या राजकीय पुढा-यांनाही तडीपार करावे. राहूल शिंदे पाटील हे या आरोपींना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करीत आहेत. शिंदे पाटलांचीही चौकशी करून कारवाईची मागणी सुरेखा गायकवाड यांनी केली.

चौकट:
खासदारसाहेब गुंडांना पाठीशी घालू नका
राहुल शिंदे पाटील हे या गुंडांना मदत करतात. खासदार साहेब, या गुंडांना तुम्ही पाठीशी घालू नका. मागासवर्गीय समाजाला न्याय द्या. या गुंडांपासून मला, माइ-या लेकरांना धोका आहे.

सुरेखा गायकवाड
मृत संतोष गायकवाड यांच्या पत्नी

चौकट:
मारेक-याच्या खांद्यावर खासदारांचा हात
माझ्या पतीची हत्या करणारे गुंड मोकाट आहेत. खासदार साहेब त्यांच्या खांद्यावर हात ठेउन फिरत आहेत. बाबासाहेब आम्हाला कोणी वाली राहिला नाही. बाबासाहेब तुम्ही परत या, मला न्याय द्या अशी मागणी सुरेखा गायकवाड यांनी केली.

चौकट:
काय आहे प्रकरण ?
दि. २२ जुन २०२३ रोजी मृत संतोष गायकवाड हे नगर-पुणे महामार्गावरून रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पारनेर फाटयावरून नारायणगव्हाणकडे येत असताना तिघांनी दुचाकीवरून येत संतोष गायकवाड यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचे घाव घालून त्यांची हत्या केली होती. या गुन्हयात अजिंक्यतारा दरेकर याच्यासह नऊ जणांविरोधात सुपा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. सध्या या आरोपींची जामीनावर सुटका झालेली आहे.

चौकट:
डॉ. आंबेडकारांच्या जयंतीदिनी सुरेखा यांची हाक
शनिवार दि. १३ एप्रिल रोजी सुजय विखे यांच्या प्रचारार्थ नारायणगव्हाण परिसरात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या ठिकाणी जाताना काढण्यात आलेल्या रॅलीत खा. डॉ. सुजय विखे हे अजिंक्यतारा दरेकर याच्या दुचाकीवर बसलेले होते. त्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशीच सुरेखा दरेकर यांनी बाबासाहेब तुम्ही परत या, मला न्याय द्या अशी आर्त हाक घातली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे