आमदार निलेश लंके यांचा खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा

पारनेर दि. 30 मार्च – ( देवदत साळवे तालुका प्रतिनिधी),
आमदार निलेश लंके यांच्याबाबत अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चा खऱ्या ठरल्या आहेत. निलेश लंके यांनी माफी मागत व दिलगिरी व्यक्त करत अजितदादांची साथ सोडून लोकसभेची निवडणूक लढविताना कोणताही राजकीय पेच निर्माण होऊ नये, म्हणून आमदारकीचा राजीनामा देऊन शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत तुतारी हाती घेतली आहे.
स्वतः निलेश लंके यांनी देखील मध्यंतरी ते शरद पवार यांच्या गटात सामील होण्याचे संकेत दिले होते. तसेच शरद पवार यांनी देखील निलेश लंके यांचे पुण्यात त्यांच्या पक्ष कार्यालयात स्वागत केले होते.
त्यावेळी निलेश लंके यांनी साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले होते. यानंतर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंके हे अहमदनगर मधील लोकप्रिय नेते आहेत. ते आमचे उमेदवार व्हावेत, त्यांनी अहमदनगर दक्षिण मधून लोकसभा निवडणूक लढवावी असे म्हटले होते.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील निलेश लंके यांची अहमदनगर दक्षिण मधून जोरदार एन्ट्री होईल आणि यंदाची निवडणूक देखणी होईल असे स्पष्ट म्हटले होते. बाळासाहेब थोरात यांच्या या विधानामुळे निलेश लंके हे महाविकास आघाडीचे 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे नगर दक्षिण मधील उमेदवार राहतील हे जवळपास स्पष्ट झाले होते.
आज लंके यांनी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर मेळाव्यात आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक लढविण्याचा व दोन लाख मताधिक्याने जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.