शहरात जो दम धरू शकतो तोच टिकू शकतो, किरण काळेंची वेळप्रसंगी शिंगावर घेण्याची सुद्धा तयारी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर (प्रतिनिधी) : पारदर्शक काम केले तर त्याला जनतेचा आधार मिळत असतो. इतर ठिकाण आणि नगर शहर यात खूप फरक आहे. नगर सोपं नाही. इथं वर्षानुवर्षे काही मंडळी काम करतात. त्यांची कार्यपद्धती वेगळी आहे. इथं जो दम धरू शकतो, तोच टिकू शकतो. वेळेला अंगावर आला तर अंगावर घ्यायची तयारी असली पाहिजे. हे नगरच वैशिष्ट्य आहे. किरण काळे हा दमदार माणूस आहे. वेळप्रसंगी शिंगावर घ्यायची, जशाला तसं उत्तर देण्याची त्यांची तयारी आहे. एक दिवस तुमचा नक्की येणार. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
नगर शहर जिल्हा काँग्रेसची यात्रेच्या नियोजनासाठीची बैठक थोरातांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आ.डॉ.सुधीर तांबे आ. लहू कानडे, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, महिला जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, माजी नगरसेवक फैयाज शेख, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, सावेडी विभाग प्रमुख अभिनय गायकवाड, हनीफ शेख, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, गणेश आपरे, मोहनराव वाखुरे, इम्रान बागवान आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक करताना किरण काळे यांनी नगर शहराच्या ऐतिहासिक मातीचा कलश राहुल गांधीना देण्यासाठीची संकल्पना सर्व कार्यकर्त्यांच्या समोर मांडली. आ.थोरात यांना माती संकलित झाल्यानंतर हा कलश काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना देण्यासाठी काळे सुपूर्द करणार आहेत. थोरातांच्या उपस्थितीमध्ये महिला काँग्रेसच्या वतीने ही माती संकलित करण्यासाठीचा कलश काळे यांना सुपूर्द करण्यात आला. राहुल गांधींची यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर थोरात यांच्या नेतृत्वाखाली किरण काळे यांच्यासह शहरातील पदाधिकारी देखील गांधींच्या समवेत यात्रेत सहभागी होणार आहेत.
आ. थोरात म्हणाले की, काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. हा प्रतिसाद पाहून भाजप आवाक झाली आहे. त्यामुळे तथ्य नसलेले आरोप ते करत आहेत. या यात्रेचा भाजपकडून धसका घेतला गेला आहे. यावेळी आ. डॉ. तांबे, आ. कानडे यांची भाषणे झाली. सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ.बापू चंदनशिवे यांनी सूत्रसंचलन केले.