सामाजिक

वार्षिक सभेपूर्वी सारडा महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोर भूखंड बचावची मागणी करत काळे झेंडे फडकवून काँग्रेसने केले सद्बुद्धी दे आंदोलन बहुचर्चित हिंद सेवा मंडळ प्रकरण

अहमदनगर दि. 21 जानेवारी (प्रतिनिधी )
 हिंदसेवा मंडळाचे सारडा महाविद्यालयाचे बहुचर्चित भूखंड प्रकरण मंडळाच्या रविवारी सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या सभेपूर्वीच चांगलेच तापले आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह आंदोलकांनी मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या सुमारे पावणेचार एकर क्षेत्राच्या भूखंड बचावासाठी जागा मागणी करणारे प्रसिद्ध जागा व्यवसायिक अरुण बलभीम जगताप, बिल्डर हर्षल भंडारी, मंडळाचे पदाधिकारी आणि तथाकथित दलाल यांना सद्बुद्धी दे आंदोलन केल्यामुळे सभेकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्या आहेत. यावेळी आंदोलकांनी काळे झेंडे फडकवत निषेध केला आहे.
आंदोलकांनी जागा व्यावसायिक अरुण जगताप, बिल्डर हर्षल भंडारी यांनाच जाहीर आवाहन केले आहे की त्यांनी हिंद सेवा मंडळाच्या जागेचा मागितलेला ताबा मागण्याच्या मागणी पासून परावृत्त व्हावे आणि मुलांना शिकू द्यावे. तसेच तथाकथित दलालांनी देखील मंडळाच्या आजीव सदस्यांची दिशाभूल न करता गंभीर असणाऱ्या कायदेशीर बाबीं बाबत अवगत करत सभेमध्ये हा विषय रद्द अथवा स्थगित करावा यासाठी आंदोलकांनी सद्बुद्धी दे म्हणत आंदोलन केले आहे. यावेळी मनोज गुंदेचा, संजय झिंजे, विलास उबाळे, सुनील क्षेत्रे, किशोर कोतकर, शंकर आव्हाड, अभिनय गायकवाड, आकाश आल्हाट, गणेश चव्हाण, चंद्रकांत उजागरे, गणेश आपरे, गंगाधर जवंजाळ, सुनील भिंगारदिवे, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, सचिन वाघमारे, दीपक ससाणे, संजय आवारे आदींसह आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले, हा राजकारणाचा विषय नाही. मुलांच्या शैक्षणिक भवितव्याचा विषय आहे. या चुकीच्या आणि हिंद सेवा मंडळाच्या शैक्षणिक हिताला बाधा आणणाऱ्या निर्णयापासून संबंधितांनी परावृत्त झाले पाहिजे. यांनी जर हे पाप केले तर त्यांना परमेश्वर सुद्धा आता माफ करणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. जागा व्यवसायिकांच्या घशात बेकायदेशीर रित्या घालून हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान यातून होणार आहे. संस्थेच्या हजारो माजी विद्यार्थ्यांमध्ये यामुळे संतापाची लाट निर्माण झाली आहे. सर्व प्रकार बेकायदेशीर रित्या सुरू आहे.
त्यांनी शिक्षण संस्थेच्या भूखंडावर डोळा ठेवू नये :
येणाऱ्या काळात यामुळे काही फौजदारी गुन्हे तसेच दिवाणी खटले जर आजीव सदस्यांवर दाखल झाले तर तो या शहराच्या इतिहासातला काळा दिवस असणार आहे. जागेचा ताबा मागणाऱ्या व्यवसायिकांनी शहरात यापूर्वी अन्य कुठे कुठे काय केले आहे हे तमाम सुज्ञ नगरकरांना माहित आहे. मात्र किमान या शहरातल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडेल अशा शिक्षण संस्थांच्या भूखंडांवर डोळा ठेवू नये, अशी मागणी यावेळी किरण काळे यांनी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे