देवळाली प्रवरा दि. 16 जानेवारी (प्रतिनिधी )
देवळाली प्रवरा येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी शिव छत्रपती पुरस्कार महाराष्ट्र शासनाला परत करण्यासाठी राज्यपालांची भेटीची वेळ मागितली आहे. तसे निवेदन आज ढूस यांनी ईमेलद्वारे राज्यपाल रमेशजी बैस यांना पाठविले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल महोदयांना पाठविलेल्या निवेदनात ढूस यांनी म्हटले आहे की,
देवळाली प्रवरा ता. राहुरी जि. अहमदनगर येथील ढूस वस्तीवरील माझे शिवछत्रपती निवास या घराच्या गेटमध्ये आवारात दि.२२/१०/२०२३ रोजी मध्यरात्री ०१:४२ वाजता चार चाकी वाहनातून दरोड्याच्या तयारीत आलेल्या चार ते पाच दरोडेखोरांनी येऊन दहशत निर्माण केली. त्याबाबत राहुरी पोलीस स्टेशनमध्ये रीतसर नोंदविण्यात आलेल्या एफ आय आर नुसार राहुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव साहेब यांनी अत्यंत बारकाईने या घटनेचा तपास करून या दहशतवाद्यांचे मोबाईल सी डी आर व डम डेटाचे माध्यमातून तीन दहशतवाद्यांचा तपास लावण्यात यश मिळविले आहे. व त्यांना रितसर चौकशीकामी हजर राहण्यास नोटीस बजावली आहे.
तथापि पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची राहुरी पोलीस स्टेशन मधून अन्यत्र बदली झाल्यानंतर या घटनेचा तपास थंडावला आहे. त्यामुळे मी स्वतः जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून लेखी निवेदन दिले व घटनेचे गांभीर्य नमूद केले. तरीही पोलीस यंत्रणेची कारवाई पुढे सरकेना म्हणून मी दि. ०१ जानेवारी २०२४ रोजी राज्य शासन जर या दरोडेखोरांवर कारवाई करू शकत नसेल तर महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वोच्च साहसी खेळाडू म्हणून मला दिलेला शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार मला माझे जवळ ठेवणे उचित वाटत नाही . त्यामुळे सदर दरोडेखोरांवर तात्काळ कारवाई करावी अन्यथा २६ जानेवारी २०२४ रोजी मला महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार परत करणार असले बाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अहमदनगरचे पालकमंत्री, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रीरामपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना लेखी निवेदन देवुन कळविले होते. तथापि १५ दिवस उलटूनही राहुरी पोलिसांकडून सदर दरोडेखोरांवर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
सबब आपणास विनंती की, मध्यरात्री माझ्या घरी आलेल्या दरोडेखोरांवर कारवाई होत नसल्याने येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाने मला दिलेला शिवछत्रपती राज्य सहासी क्रीडा पुरस्कार परत करण्यासाठी मला आपल्या भेटीची योग्य वेळ मिळावी अशी विनंती आप्पासाहेब ढूस यांनी त्यांचे निवेदनाच्या शेवटी राज्यपाल महोदयांना केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा