खाजगी कंपन्यांसाठी बैठक घेणाऱ्या स्थायी समितीला व्यापारी, दुकानदारांसाठी बैठक घ्यावीशी का वाटली नाही ? काँग्रेसचा सवाल ‘ नजरचुकीने ‘ ठराव संमत झाल्याचा जावई शोध लावणाऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या अन्नात मीठ कालवू नये – मनोज गुंदेचा

अहमदनगर दि. 30 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : बुधवारी स्थायी समितीने बैठकीत केबल, गॅस टाकण्यासाठी काम करणाऱ्या शहरा बाहेरील मोठमोठ्या कंपन्यांसाठी रस्ते खोदाई शुल्कामध्ये कंपन्यांनी शुल्क भरण्यास विरोध केला म्हणून अति जलद वेगाने तत्परता दाखवत सुमारे पाच हजार रुपयांची सूट देण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांना या शहरातील व्यापारी, दुकानदारांचा व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीसाठी असणारा विरोध दिसला नाही का ? ठराव रद्द करण्यासाठी त्यांना चर्चा करावीशी वाटली नाही का ? व्यापाऱ्यांचा आक्रोश त्यांना ऐकू येत नाही का ?, असा संतप्त सवाल शहर काँग्रेसने केला आहे. नजर चुकीने ठराव संमत झाल्याचा जावई शोध लावणाऱ्या तथाकथित भाजपच्या व्यापारी नेत्यांनी व्यापारांच्या अन्नात मीठ कालवू नये, असा इशारा ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा यांनी दिला आहे.
बुधवारी भाजपचे वसंत लोढा यांनी प्रसिद्धी पत्रक काढत म्हटले होते की, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सर्व नगरसेवकांना शहरातील व्यापारी, व्यावसायिकांची काळजी आहे. कदाचित नजर चुकीने शुल्क वसुलीचा ठराव स्थायी समिती, महासभेत मंजूर झाला असावा. तर दुसरीकडे स्थायी समितीची बैठक होऊन त्यात कंपन्यांसाठी रस्ते खोदाईचे शुल्क तब्बल पाच हजारांनी कमी करण्यात आले. मात्र व्यापाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कोणतीच चर्चा झाली नाही. यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.
गुंदेचा म्हणाले की, शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे ३५ ते ४० हजार व्यापारी, दुकानदारांच्या पाठीशी उभे राहण्याची जाहीर भूमिका घेतली. त्याला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे. येत्या ४ डिसेंबरला दिवंगत शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांना शिवालयात जाऊन अभिवादन करत बाजारपेठेमध्ये किरण काळे धरणे आंदोलनासाठी बसणार आहेत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रश्न सोडविण्यासाठी काळे यांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका एका बाजूला घेतली आहेत. तर दुसऱ्या बाजूला काही तथाकथित नेते इतर वेळी बाजारात वातावरण गरम करतात. मात्र जेव्हा व्यापाऱ्यांच्या पोटपाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांची ढोंगीपणा करत बाजू मांडत व्यापाऱ्यांचे शाब्दिक सांत्वन करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. नजरचुकीने ठराव संमत झाल्याचा जावई शोध लावणाऱ्या अशा तथाकथित स्वयंघोषित नेत्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे पितळ यामुळे उघड झाले आहे. त्यामुळे विनाकारण कोणी यामध्ये राजकारण आणू नये. काँग्रेस, व्यापारी, दुकानदारांच्या तीव्र विरोधानंतर नगरसेवकांचे जर आता मतपरिवर्तन झाले असेल तर त्यांनी स्वतः विरोधाचे पत्र महापालिका आयुक्तांना देऊन नजरचुकीने समर्थन दिल्याचा लेखी खुलासा करावा आणि व्यापारांवरील अन्याय थांबवावा, असे जाहीर आवाहन काँग्रेसने केले आहे.
किरण काळे यांनी जाहीर केलेल्या दुकानदारांसाठीच्या धरणे आंदोलनामध्ये शहराच्या आमदारांनी देखील सहभागी व्हावे, असे जाहीर निमंत्रण यापूर्वीच काँग्रेसने दिले आहे. मात्र अद्याप पर्यंत आमदारांनी आपली कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. सभागृहामध्ये त्यांच्याच पक्षाच्या सत्तेत सहभागी असणाऱ्या आणि राज्यात सत्तेत एकत्र असणाऱ्या सर्वच पक्षांनी या ठरावाला संमती दिलेली आहे. ठराववर सूचक, अनुमोदक म्हणून संमती दिलेली आहे. बाजारपेठ अशांत करण्यासाठी पुढे येणारे आता व्यवसायिकांच्या रोजी रोटीवर घाला घातल्यानंतर मात्र पुढे यायला तयार नाहीत. हे व्यापाऱ्यांना कळून चुकले आहे. त्यामुळे व्यापारीच आता शहाणे होत अशा ढोंगी प्रवृत्तींना नजर चुकीने ही थारा देणार नाहीत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मीनाताई चोपडा यांनी केलेल्या ठरावाला विरोधाचे आम्ही स्वागत करतो. मात्र त्यांना याचीही आठवण करून देतो की, त्या ठरावावर अनुमोदक म्हणून त्यांच्याच सारसनगर प्रभागातील राष्ट्रवादीच्याच सहकारी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांचे नाव आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांना शक्तिमानच गंगाधर आहे हे सांगण्याची गरज नाही. ते सुज्ञ आहेत असाही टोला गुंदेचा यांनी लगावला आहे.