राजकिय

शहरातील रस्त्यांच्या भ्रष्टाचार प्रकरणी किरण काळेंची अँटी करप्शनकडे फिर्याद फिर्यादीत ८ आयुक्त, ६ शहर अभियंत्यांचा समावेश राजकीय वरदहस्थातून अधिकारी, ठेकेदारांचा भ्रष्टाचाराचा कळस, बहुतांशी ठेकेदार राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, काळेंचे गंभीर आरोप

1 डिसेंबरला घेणार अप्पर महासंचालक नांगरे पाटील यांची मुंबईत भेट

अहमदनगर दि.29 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : नगर शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. याला राजकीय वरदहस्थातून मनपा अधिकारी, ठेकेदारांच्या संगममताने झालेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार जबाबदार असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काळे यांनी ७७६ रस्त्यांच्या कामात नगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावे कामांचे गुणवत्ता टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट तयार करण्यासाठी तंत्रनिकेतन, राजपत्रित अधिकारी यांच्या नावे बनावट शिक्के, लेटरहेड तयार करून रस्त्यांच्या कामात कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अँटी करप्शनचे राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील व नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा धाडगे यांच्याकडे ऑनलाईन फिर्याद दाखल केली आहे. निकृष्ट कामे करणारे बहुतांशी ठेकेदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा गंभीर आरोप काळेंनी केला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती काळे यांनी काँग्रेसच्या शिवनेरी संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी पुराव्यांची शेकडो कागदपत्र पत्रकारांना दाखवली. काळेंनी आपल्या फिर्यादीत सध्याचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यासह सन २०१६ ते २०२३ मधील ८ आयुक्त, शहर अभियंता मनोज पारखे,अभियंता श्रीकांत निंबाळकर, सेवानिवृत्त शहर अभियंता सुरेश इथापे यांच्यासह ६ शहर अभियंते, बांधकाम विभागाचा चार्ज असणारे सात वर्षातील सर्व उपायुक्त, बांधकाम, लेखा विभागातील कर्मचारी, ठेकेदार, त्यांच्या संस्थांचे प्रोप्रायटर, भागीदार, ऑडिटर, शासकीय तंत्रनिकेतन, अहमदनगर तसेच ज्या, ज्या शासकीय, निमशासकीय संस्था यांनी बनावट गुणवत्ता चाचणी अहवाल दिले त्या प्रक्रियेशी निगडित सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध सामूहिक संगनमत करत कट कारस्थान रचून रस्त्यांच्या कामात शासन व जनतेची फसवणूक करत भ्रष्टाचार केल्याची फिर्याद दिली आहे.

निकृष्ट दर्जाची कामे करून नगर शहराला खड्ड्यात घालणाऱ्या दोषींवर लाच लुचपत प्रतिबंधक कायदा कलम ७ आणि १३ तसेच भारतीय दंड संहिता कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४६६, १२० ब, १९६, २०१, २०२, २०४, ४७५, ४७६, ४७७ अ, ३४ अन्वये जनहितार्थ अति जलद फौजदारी गुन्हा दाखल करावा असे काळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फसवणूक करणे, अपहार, भ्रष्टाचार करणे, बनावट दस्तऐवज तयार करणे, पुरावे नष्ट करणे, उपकरणांचा उपयोग करून खोटे शिक्के तयार केल्या बद्दल सात ते दहा वर्षांपर्यंतची शिक्षा असणारे दखलपात्र गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवावेत. भ्रष्टाचारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संपत्ती, जंगम, स्थावर मालमत्तेची चौकशी करावी. अपहारातील सहभागींची खुली चौकशी व्हावी. गैर मार्गाने मिळवलेल्या बेहिशोबी संपत्तीचा शोध घेऊन ती तात्काळ जप्त करावी. अशी तक्रार काळेंनी केली आहे.

काळेंच्या तक्रार आणि शासकीय तंत्रनिकेतन समोर करण्यात आलेल्या आंदोलना नंतर प्राचार्यांनी १६ जूनला आदेश काढत २०१६ ते २०२० कालावधीतील अहवालांची सत्यासत्यता पडताळणी करणे कामी पाच जणांची चौकशी समिती गठित केली होती. यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाच्या विभाग प्रमुखांना समिती प्रमुख करत विद्युत, यंत्र अभियांत्रिकी विभाग, प्रबंधक यांचा समावेश होता. समितीने अहवाल सादर केला आहे. सदरहू चौकशी अहवालामध्ये अहमदनगर मनपाकडून प्राप्त ८७९ चाचणी अहवाल व त्रस्त चाचणी अहवालांपैकी ७२५ चाचणी व ५१ त्रयस्थ परीक्षण अहवाल असे एकूण ७७६ अहवाल शासकीय तंत्रनिकेतन संस्थेतून देण्यातच आलेले नसल्याची धक्कादायक बाब पूराव्यानिशी निष्पन्न झाली असल्याचे काळेंनी म्हटले आहे.

भ्रष्टाचाराला राजकीय नेतृत्व जबाबदार :
मनपाच्या बांधकाम, पाणी पुरवठा, विद्युत, कचरा संकलन अशा विविध विभागांच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यां कडून काम करुन घेण्याची जबाबदारी शहर लोकप्रतिनिधी, नगरसेवकांची आहे. मात्र आपल्या बेरोजगार कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी त्यांच्या नावाने टेंडर मॅनेज करून दिले जातात. तीस ते शंभर टक्क्यांपर्यंत टक्केवारी घेतली जाते. निकृष्ट कामे कागदोपत्री जिरविण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केले जातात. बिलं लाटली जातात. या टक्केवारीतून कमावलेला पैसा विधानसभा, मनपा निवडणूकीत मतदारांना वाटण्यासाठी राजकीय नेतृत्व वापरते. रस्त्यांच्या दुरावस्थेला राजकीय नेतृत्व जबाबदार असून मतदारांनी आपण नेमके कुणाला निवडून देत आहोत याचा अंतर्मुख होत विचार करण्याची गरज असल्याचे मत काळे यांनी यावेळी व्यक्त केले.

भ्रष्टाचार दडपण्यासाठी खोटे गुन्हे :
काँग्रेसने शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावरून अनेक निवेदनं दिली. आंदोलनं केली. मुंबईच्या आझाद मैदानावर खड्ड्यांचे प्रदर्शन भरवले. आत्मदहनाचा इशारा दिला. मनपावर आसूड मोर्चा काढला. त्यावेळी माझ्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांवर भ्रष्टाचार दडपण्यासाठी राजकीय दबावातून खोटे गुन्हे दाखल केले गेले. रस्त्याचा मलिदा खाणारे चोर मोकाट फिरत आहेत. मात्र रस्त्यांसाठी मोर्चा काढला म्हणून माझ्यासह काँग्रेस एक वर्षापासून न्यायालयात खेटा मारत आहेत. नगरकरांसाठी असे शंभर खोटे गुन्हे अंगावर घेण्याची माझी तयारी आहे. माञ शहराला खड्ड्यात घालणाऱ्यांना तुरुंगात घातल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी काळे यांनी दिला.

नांगरे पाटलांची भेट घेणार, पुरावे सादर करणार :
दरम्यान, १ डिसेंबर रोजी अँटी करप्शनचे अप्पर पोलीस महासंचालक नांगरे पाटील यांची मुंबई येथे समक्ष भेट घेणार असून याबाबत जलद गतीने सखोल तपास करण्याची मागणी करणार असल्याचे काळे यांनी सांगितले नाशिक परिक्षेत्र पोलीस अधीक्षक धाडगे यांच्याशी दूरध्वनी वरून बोलणे झाले असून लवकरच नाशिक कार्यालयात समक्ष हजर राहून शेकडो कागदपत्रांचे पुरावे तपास कामी दाखल करणार असल्याचे काळे म्हणाले.

यामागे बड्या नेत्याचा दबाव :
किरण काळे यांनी मनपा आयुक्त, शासकीय तंत्रनिकेतनकडे अनेक वेळा याबाबत तक्रारी केल्या होत्या. आयुक्तांनी लेखी आश्वासन देऊन ही जाणीवपूर्वक भ्रष्टाचाऱ्यांना संगनमत करत पाठीशी घातल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. तंत्रनिकेतनने पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यासाठी धाव घेतली होती. त्यासाठी त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. कोतवाली पोलीस स्टेशनला पत्र दिले. मात्र पोलिसांनी त्यांना मनपाकडे उपलब्ध असणारे बनावट कागदपत्रांचे पुरावे दाखल करायला सांगितले. तसे तंत्रनिकेतनने मनपा आयुक्त यांना लेखी कळवले. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक ते उपलब्ध करून दिले नाही. स्वतः ही गुन्हा दाखल केला नाही. आयुक्त स्वतः याच्यामध्ये संगनमताने सहभागी असून अन्य अधिकारी, ठेकेदारांना वाचण्यासाठी मनपा सत्तेचा रिमोट कंट्रोल ज्याच्या हाती आहे अशा शहरातल्या बड्या नेत्याचा त्यांच्यावर दबाव असल्याचा दावा काळेंनी केला आहे.

यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, अलतमश जरिवाला, शहर जिल्हा सचिव शंकर आव्हाड, माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, अपंग हक्क काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे