पालकमंत्री, दक्षिण खासदारांनी पंतप्रधान मोदींसह जनतेची फसवणूक केली : किरण काळे शहर जिल्हा काँग्रेसकडून जिल्हा आयुष रुग्णालयाची ईन कॅमेरा पोलखोल

अहमदनगर दि. 21 नोव्हेंबर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या जिल्हा आयुष्य रुग्णालयाची शहर जिल्हा काँग्रेसकडून ईन कॅमेरा पोलखोल करण्यात आली. यावेळी अनेक गंभीर आरोप काँग्रेसने केले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दक्षिणेचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खोटी माहिती देऊन फसवणूक करत बंद अवस्थेतील रुग्णालयाचे ऑनलाइन लोकार्पण त्यांच्या हस्ते करवून घेतले. त्यांनी पंतप्रधानांसह जनतेची फसवणूक केल्याचा आरोप शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
काळे यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसह आयुष्य रुग्णालयाची ईन कॅमेरा पाहणी केली. यावेळी पंतप्रधान, पालकमंत्री, जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. मागील महिन्यात २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथे पंतप्रधान आले असतात त्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालक मंत्री, खासदारांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण केले होते. काँग्रेसने केलेल्या पाहणीमध्ये प्रत्यक्षात रुग्णालय बंद अवस्थेमध्ये आढळून आले. यामुळे काळे संतप्त झाले. त्यांनी उपस्थित दोन डॉक्टर, कर्मचाऱ्यांना फैलावर धरले. त्यांची चांगलीच भांबेरी उडाली.
काँग्रेसच्या पाहणीमध्ये रुग्णालयाच्या बिल्डिंगमध्ये असणारे स्री पंचकर्म कक्ष, रक्त तपासणी प्रयोगशाळा, वैद्यकीय अधिकाऱ्यांची कक्ष, उपकर्म कक्ष, मेडिकल स्टोअर, अंतररुग्ण कक्ष, लेखा विभाग, बाह्यरुग्ण कक्ष, इलाज बीज तदबीर कक्ष, योगा बाह्यरुग्ण कक्ष, निसर्ग उपचार कक्ष, योग सभागृह, गर्भसंस्कार व हिरकणी कक्ष, शस्त्रक्रिया विभाग सर्वच बंद अवस्थेत आढळून आलं. बिल्डिंगमध्ये धुळीचे साम्राज्य असून आवारामध्ये प्लास्टिक, जागोजागी कचरा साचलेला आढळून आला. या ठिकाणी होमिओपॅथिक, आयुर्वेदिक, युनानी, योग अशा चार शाखांच्या उपचार पद्धती केंद्र सरकारच्या योजनेतून उभारण्यात उभारण्यात आल्या आहेत.
काळे यावेळी म्हणाले की, नगर शहरासह जिल्ह्यातील महिला, बालक तसेच गोरगरीब जनतेसाठी जनतेच्याच पैशातून कोट्यावधी रुपये खर्चून हे रुग्णालय उभे करण्यात आले. मात्र पंतप्रधानांच्या हातून त्याचे केवळ फोटो सेशन करुन बंद अवस्थेत लोकार्पण करण्यात आले. लोकार्पण झालेले असल्यामुळे शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून रोज या ठिकाणी मोठ्या संख्येने रुग्ण व त्यांचे नातेवाईक उपचारासाठी येतात. मात्र त्यांना रिकाम्या हाती परतावे लागते. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पालकमंत्री, दक्षिणेच्या खासदारांनी हा निंदनीय प्रकार केला आहे. अशा लोकप्रतिनिधींवर जनतेने काय विश्वास ठेवायचा, असा संतप्त यावेळी काळेंनी केला.
पंचकर्म तज्ञ झाला केमिस्ट :
पोलखोल करतेवेळी काळे यांनी कार्यकर्त्यांसह तळमळल्या वरील औषध भांडाराला भेट दिली. यावेळी त्या ठिकाणी एक कर्मचारी आढळून आला. त्याला काळे यांनी अनेक प्रश्न विचारले असता तो भांबावून गेला. त्याने सांगितले की, मी पंचकर्म तज्ञ आहे. काळे यांनी त्याला उलट प्रश्न करताना विचारले की आपण जर केमिस्ट नसून पंचकर्म तज्ञ आहात तर औषध विभागात काय करत आहात ? यावेळी त्याने तो नोंदणी करणे, केस पेपर देणे व औषधे वितरित करण्याचे काम करत असल्याचे सांगितल्याचा दावा काळे यांनी केला आहे. यावर काळे यांनी त्याठिकाणी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉ. मिरीकर यांना धारेवर धरत संताप व्यक्त केला.
बिल्डिंग उभारणी सदोष :
पत्रकार चौक ते डीएसपी चौक हा रस्ता वर असून रुग्णालयाची वास्तू ही खड्ड्यामध्ये बांधण्यात आली आहे. त्यामुळे पाऊस काळामध्ये या ठिकाणी वॉटर लॉगिंग होऊन तळे साचले जाण्याची शक्यता आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याला रुग्णालयातच धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हणत बिल्डिंगची उभारणी सदोष झाली असल्याच्या गंभीर मुद्द्यावर किरण काळे यांनी हरकत घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.
अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा :
यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. घोगरे यांच्याशी काळे यांनी संपर्क साधला. सिव्हील हॉस्पिटल येथे जिल्हा आयुष अधिकारी डॉ. घुगे यांची भेट घेण्यात आली. यावेळी काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील जाब विचारला. १७ नोव्हेंबर पर्यंत भरतीसाठी अर्ज सादर करण्याची जाहिरात देण्यात आली होती. यामध्ये हजारो अर्ज आले आहेत. वास्तविक पाहता प्रशासनाने या बाबींची पूर्तता लोकार्पण होण्या पूर्वीच करायला हवी होती असे म्हणत काळे यांनी संताप व्यक्त केला. पुढील आठ दिवसांच्या आत भरती प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी निर्धारित साठ लोकांच्या स्टाफसह सर्व सोयी सुविधांसह खऱ्या अर्थाने लोकार्पण करून शहरासह जिल्ह्यातील गोरगरिबांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. अन्यथा काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री, दक्षिणचे खासदार, जिल्हा प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काळे यांनी दिला.
यावेळी मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी काँग्रेस जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, गणेश चव्हाण, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, जयराम आखाडे, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागर, दीपक काकडे, रोहिदास भालेराव, मुस्तफा खान, भैय्यासाहेब पटेल आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.