गणपती विक्रेत्यांना गांधी मैदानात स्टॉल लावण्यासाठी परवानगी देण्याची काँग्रेसची आयुक्तांकडे मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी) : कोरोना नंतर पहिल्यांदाच यावर्षी सर्व सण, सार्वजनिक उत्सव साजरे होत आहेत. नागरिकांमध्ये मोठा उत्साह आहे. दरवर्षी गांधी मैदानामध्ये गणपती आणि संबंधित मालांच्या विक्रीचे स्टॉल लावले जातात. मात्र कोरोना काळात या ठिकाणी स्टॉल लावण्यावर मनपाने बंदी घातली होती. यावर्षी या विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात गांधी मैदानात स्टॉल लावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त पंकज जावळे यांच्याकडे केली आहे.
यावेळी शिष्टमंडळामध्ये शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण भैय्या गीते पाटील, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला,शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, अभिनय गायकवाड, नदीम शेख, अक्षय कुलट, तौफिक सय्यद, सुजित क्षेत्रे, अरीश कुरेशी, दीपक जपकर अक्षय पाचारणे, प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण, गौरव घोरपडे, संजय डांगे, दिलीप पवार, स्वप्निल पाठक, रमेश कोरडे आदींसह बाजारपेठेतील व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले की, गांधी मैदान ही मोकळी जागा आहे. उत्सव काळामध्ये तीन-चार दिवसांसाठी ही जागा मनपाने विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांच्या दुकानांसमोर स्टॉल लागणार नाहीत. यामुळे व्यापाऱ्यांची देखील गैरसोय होणार नाही. त्याचबरोबर हातावरती पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना देखील गांधी मैदानाच्या मोकळ्या जागेमध्ये स्टॉल लावून व्यवसाय करता येईल. त्यातून त्यांचाही उदरनिर्वाह योग्यरीत्या होऊ शकेल. यामुळे रस्त्यावरती ट्राफिकची समस्या देखील उत्सव काळात निर्माण होणार नाही.
आयुक्त पंकज जावळे यांनी काँग्रेसच्या मागणीबाबत संबंधित विभाग प्रमुखांशी तातडीने चर्चा करत संबंधितांना या बाबतीमध्ये प्रस्ताव सादर करण्याच्या लेखी सूचना केल्या आहेत. स्टॉल धारकांना या ठिकाणी परवानगी देण्याबाबत त्यांनी सकारात्मकता दाखविली आहे. मात्र एन दोन दिवसावर आलेल्या गणेशोत्सवामुळे स्टॉल धारकांमध्ये मनपाकडून परवानगी मिळेल की नाही याबद्दल संभ्रमावास्था असल्यामुळे आणि गांधी मैदानात मनपाने परवानगी नाकारली असल्याची अफवा पसरल्यामुळे या ठिकाणी स्टॉल लावण्याकरिता अनेकांना इच्छा असून देखील मनपाकडे अर्ज करता आलेले नाही. मात्र आता मनपाने सकारात्मकता दाखवल्यामुळे स्टॉल लावू इच्छिणाऱ्या व्यावसायिकांना काँग्रेसच्या मागणीमुळे फायदा होणार आहे.