प्रशासकिय

माझी वसुंधरा स्पर्धेत राज्यात कर्जत नगरपंचायत अव्वल, सर्व सामाजिक संघटनेच्या श्रमप्रेमीना सलग श्रमदानाचे फलित मिळाले

कर्जत( प्रतिनिधी ): दि ५ जून
माझी वसुंधरा २ स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने नगरपंचायत विभागात प्रथम क्रमांक मिळवत मोठे यश संपादन केले. सदरचा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, प्रकल्प संचालक मनीषा म्हैसकर आदींच्या हस्ते हा पुरस्कार नगरपंचायतीच्या पदाधिकारी, मुख्याधिकारी आणि सर्व सामाजिक संघटना श्रमप्रेमीनी मुंबई येथे स्वीकारला. कर्जत नगरपंचायतीस पहिला क्रमांक मिळाल्याची घोषणा होताच कर्जतमध्ये मोठा जल्लोष करण्यात आला. मागील ६११ दिवसांपासून सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतीने सलग श्रमदान केले होते. त्याचे फलित कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक मिळाला असल्याची भावना कर्जतकरांनी व्यक्त केली.
माझी वसुंधरा २ स्पर्धेत कर्जत नगरपंचायतीने सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेसाठी सर्व सामाजिक संघटना कर्जत आणि कर्जत नगरपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने भूमी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वावर कर्जत शहरात मागील ६११ दिवसापासून मोठे सामाजिक कार्य उभारले होते. यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण करीत अनेक भागाचे आणि उपनगराचे रुपडे बदलण्याचे काम झाले होते. या श्रमदानात आणि वृक्षारोपणासाठी कर्जत जामखेडचे आ रोहित पवार, माजीमंत्री राम शिंदे, बारामती ऍग्रोच्या विश्वस्त सुनंदा पवार, राजेंद्र पवार यांच्यासह कर्जतचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी वेळोवेळी सहभाग घेतला होता. तसेच अनेक वेळा लोकसहभागातून लेकीचे झाड यासह वाढदिवसानिम्मित कर्जतकरानी यात सक्रिय सहभाग घेत सहकार्य केले होते. या सर्व लोकसहभागाचे फलित म्हणून कर्जत नगरपंचायतीस राज्य पातळीवर माझी वसुंधरा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांकाची घोषणा होताच पंचायत समिती सभागृहात सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारानी मोठा जल्लोष करीत पर्यावरण पूरक फुलांच्या पाकळ्या आणि औषधी हळद उडवत कर्जत शहरात विजयी फेरी काढली. शेवटी विजयी फेरीची सांगता ग्रामदैवत संत श्री सदगुरु गोदड महाराज मंदिरात दर्शन घेत करण्यात आली.
यावेळी बोलताना श्रमप्रेमी आशिष बोरा म्हणाले की, मागील अनेक दिवसांपासून सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार आणि सर्व कर्जतकरांनी राजकारण विरहित काम केल्याचा परिणाम आज कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक मिळाला. त्यांचे सर्व श्रेय सर्व ध्येय वेडे कर्जतकर, स्थानिक पदाधिकारी आणि श्रमप्रेमीच्या सलग श्रमदानामुळे शक्य झाले आहे. यावेळी नगरसेवक अभय बोरा, सतीश पाटील, माजी नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, माजी नगरसेविका मनीषा सोनमाळी, हर्षदा काळदाते, भाऊसाहेब रानमाळ, कोपनर सर, काकासाहेब काकडे, नितीन देशमुख, घनश्याम नाळे, सुनील साळुंके, राजकुमार चौरे, सत्यजीत मच्छिंद्र, आण्णा मेहत्रे आदी श्रमप्रेमीनी आपले मनोगत व्यक्त करताना श्रमदान आणि वृक्षारोपण करतानाचे अनुभव कथन करीत आजच्या पुरस्काराने भारावून गेल्याची प्रतिक्रिया व्यक्त करीत आनंदोउत्सव साजरा केला.
यावेळी सर्व सामाजिक संघटनेचे सर्व श्रमप्रेमी, कर्जत नगरपंचायतीच्या सफाई कर्मचारी यांच्यासह कर्जतकर नागरिकांनी पंचायती समिती सभागृहात माझी वसुंधरा स्पर्धेचा निकाल आणि सन्मान सोहळा पाहिला.

चौकट : सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतीच्या मेहनतीचे फळ मिळाले – नामदेव राऊत
कर्जत शहरात मागील ६११ दिवसांपासून माझी वसुंधरा स्पर्धा आणि स्वच्छता अभियानात सर्व सामाजिक संघटना व कर्जत नगरपंचायतीने लोकसहभागातून मोठे कार्य उभे केले होते. मागील वर्षी दुसरा क्रमांक मिळाला होता. मात्र त्याने खचून न जाता पहिलाच क्रमांक मिळवण्यासाठी या श्रमप्रेमीनी आपले कार्य अखंडित सुरूच ठेवले होते. आज या सर्वांच्या कार्यामुळेच कर्जत नगरपंचायतीस प्रथम क्रमांक मिळाला याचा आपणास अभिमान आहे. वेळोवेळी या कार्यात आ रोहित पवार, बारामती ऍग्रोच्या सुनंदा पवार, राजेंद्र पवार यांनी सहभाग घेत श्रमप्रेमीबरोबर काम करीत मनोबल वाढविले होते. यासह शहरातील सर्व शाळा, विद्यालय, महाविद्यालय आणि एनसीसी छात्र यांनी देखील सहभाग नोंदविला होता या सर्वाचे आभार आणि धन्यवाद प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषदेत मानले.
2) पिवळ्या टी शर्टवाल्याची मेहनत रंगली
सर्व सामाजिक संघटनेचे पिवळे टी शर्टधारक श्रमप्रेमीनी आपले श्रमदानाचे कार्य ऊन, वारा आणि पावसात अखंडपणे अविरत सुरूच ठेवले होते. त्यांनी आपल्या कार्याने कर्जत शहरातील अनेक भागात रूप बदलण्यास मोठे सहकार्य केले. “स्वच्छ कर्जत, सुंदर कर्जत आणि हरित कर्जतसाठी” ध्येयवेडे असलेल्या श्रमप्रेमीची मेहनत आजच्या प्रथम पुरस्काराने फळास आली असल्याची प्रतिक्रिया कर्जतकर व्यक्त करीत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे