परिचारिका करत असलेली रुग्णसेवा आदरास पात्र : शिंदे
परिचारिका दिनानिमित्त बूथ हॉस्पिटलच्या नर्सेसचा सत्कार

अहमदनगर दि.१२ मे(प्रतिनिधी) – परिचारिका असा शब्द उच्चारल्याबरोबर रुग्णांची सेवा करणारी, रुग्णांना धीर देणारी व त्यांचे मनोबल उंचावणारी, रुग्णाच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनून आरोग्याची काळजी घेणारी स्त्री आपल्यासमोर उभी राहाते. कोरोनाकाळात तर परिचारिका रुग्णांची सेवा करण्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या कुटुंबाला दुर्लक्षित करून सेवा दिली. त्यामुळे परिचारिका करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
१२ मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोरोना काळात बाधितांच्या थेट संपर्कात राहून परिचारिका त्यांची दिवस-रात्र सेवा केली. कोरोना उद्रेकाशी सामना करताना रूग्णसेवेतील मोठा वाटा उचलणाऱ्या बूथ हॉस्पिटलमधील परचारिकांचा स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष शिंदे यांनी सत्कार केला. यावेळी हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे, सिस्टर सत्त्वशिला वाघमारे, सिस्टर लता वाघमारे, सिस्टर सरला संसारे, आदिनाथ कांबळे, विजय कसबे उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, कोरोना काळात परिचारिकांनी रुग्णांची केलेली सेवा व त्या योगे करत असलेल्या मानवतेचा सेवेचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. सध्याचा काळ हा आरोग्य सेवेतील महत्त्वाचा काळ मानला जात आहे. या काळात सेवा देताना परिचारिका दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आलेखही खाली येत आहे. त्यात आता रुग्णसंख्या कमी होताना परिचारिकांनी दिलेली सेवा मोलाची ठरली आहे.