
काँग्रेसने बाजारपेठेत लावलेल्या “त्या” फलकांची जोरदार चर्चा
अहमदनगर दि.९ मार्च(प्रतिनिधी) : काँग्रेसने बाजारपेठेमध्ये “ओ आयुक्त साहेब, फलक लावा की जरा…” अशा मथळ्याखाली फलक लावले आहेत. “बाजारपेठेत सुरू असलेल्या कामांची जनतेला माहिती कधी देणार ?” असाही सवाल या फलकांवर काँग्रेसने थेट आयुक्तांना जाहीररीत्या विचारला आहे. काँग्रेसच्या या फलकांची बाजारपेठेसह शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यावर आम्ही विकासाची कामे करूच मात्र आज मनपात महापौर, उपमहापौर जरी काँग्रेसचा नसला तरी जनतेच्या मनातील खरा विरोधी पक्ष म्हणून नागरी प्रश्नांवर आवाज उठविणे आमचे कर्तव्य असल्याचे, शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.
बाजारपेठेसह शहरामध्ये सुमारे रू. १३० कोटीहून अधिक रकमेच्या रखडलेल्या भुयारी गटार योजनेचे काम सुरू असल्याचे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. इतर योजनांच्या कामामुळेच बाजारपेठेतील रस्त्याची कामे लांबल्याचे कारण महापालिका देत आहे. काँग्रेसने बाजारपेठेतील रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व्यापाऱ्यांची स्वाक्षरी मोहीम राबवत आयुक्त, शहर अभियंता, उपायुक्त यांच्यासमवेत व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासह मागील बैठक केली होती.
या वेळी काँग्रेसने आयुक्तांना बाजारपेठेला तातडीने धुळमुक्त करत रस्त्यांची कामे पूर्ण करण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या दणक्यानंतर मनपाने चितळे रोड, तेलीखुंट, दाळ मंडई या रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती डागडुजी केली आहे. बाजारपेठेत सुरू असलेल्या कामांची माहिती देणारे फलक कामाच्या ठिकाणी लावण्याची मागणी यावेळी काँग्रेसने केली होती. तशा सूचना ठेकेदाराला देण्यात याव्यात असे म्हटले होते. मात्र अजूनही “ते” फलक मनपाने न लावल्यामुळे काँग्रेसने स्वतःच कामाचे नाव, योजनेचे नाव, काम पूर्ण करण्याचा कालावधी, कामाची मंजूर रक्कम, ठेकेदार संस्थेचे नाव, ठेकेदार संस्था प्रतिनिधी व अधिकारी यांची नावे व संपर्क क्रमांक अशी माहिती व्यापारी व नगरकरांना देण्यासंदर्भात नमूद केले असून त्यासमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे की, कोणतेही विकास काम केले जाते त्यावेळी त्या कामाचा तपशील नागरिकांना समजण्यासाठी अशा माहितीचे फलक लावणे अनिवार्य असते. यामुळे कामातील पारदर्शकता लोकांसमोर येत असते. मात्र जाणीवपूर्वक मनपा यंत्रणा हे फलक लावत नाही. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या यंत्रणेमुळे नगर शहराची आज दैनावस्था आहे. सुरु असलेल्या कामांची माहिती पारदर्शकपणे नगरकरांना मिळाली पाहिजे. या फलकांवर असणारे प्रश्नचिन्ह मिटवून मनपाने त्यावरील रिकाम्या जागा भरण्याचे काम करत कामांमध्ये पारदर्शकता आणण्याची गरज असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.