नाताळ सणानिमित्त आयोजित ख्रिसमस कंटाटा महानाट्याला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद ख्रिश्चन युवकांच्या प्रगतीचे चंद्रकांत उजागरेंकडे व्हिजन : किरण काळे

अहमदनगर दि. 25 डिसेंबर – (प्रतिनिधी) : नाताळ सणाचे औचित्य साधून फेथ फाउंडेशनच्या वतीने “ख्रिसमस कंटाटा” या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. नगर शहरात पहिल्यांदाच ख्रिस्त जन्मावर आधारित असे नाटक सादर करण्यात आले. एकाच वेळी शंभरहून अधिक कलाकारांनी ही कलाकृती सादर केली. यावेळी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी करत नाटकाला उदंड प्रतिसाद दिला. अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाचे शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे यांच्या पुढाकारातून महानाट्याचे करण्यात आलेले आयोजन कौतुकास्पद आहे. त्यांची समाजाच्या प्रगतीसाठी तळमळ आहे. ख्रिश्चन युवकांच्या प्रगतीचे त्यांच्याकडे व्हिजन आहे, असे प्रतिपादन यावेळी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले.
स्टेशन रोडवरील बॉईज हायस्कूलच्या प्रांगणात महानाट्याचा देखणा सोहळा पार पडला. थंडीचा पारा चढलेला असून देखील रात्री उशिरापर्यंत प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला. सीलएफ तथा ख्रिश्चन लिडर्स फेलोशिप या संस्थेची नाट्य निर्मिती आहे. यथोचित नेपथ्य, भव्य मंचावरील कलाकारांचा सहज वावर, उत्तम अभिनय, प्रत्येक दृश्यातील जिवंत सादरीकरण, लक्षवेधी संवाद, थरारक दृष्ये, तत्कालीन समर्पक वेशभूषा, समयोचित प्रकाश योजनेने रसिकांची मने जिंकली.
अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उजागरे यांचा काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अहमदनगर पहिली मंडळी (काँग्रि.) पीटीआर नं. डी १८ चे आचार्य तथा अध्यक्ष रेव्ह. सनी मिसाळ, अहमदनगर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेव्ह. सुनिल भांबळ, ब्रदर स्तेफन गायकवाड, बूथ हॉस्पिटलचे डॉ. देवदान कळकुंबे, नगरसेविका रूपालीताई पारगे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक संजय झिंजे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश आल्हाट, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, सरचिटणीस गंगाधर जवंजाळ, समीर शेख आदींसह मान्यवर उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले, अल्पसंख्यांक ख्रिश्चन समाजातील युवा पिढीच्या प्रगतीसाठी फेथ फाउंडेशन विविध उपक्रम सातत्याने राबवत असते. चंद्रकांत उजागरे यांचा यासाठी सातत्याने पुढाकार असतो. युवा पिढीला दिशादर्शक योग्य मार्गदर्शन करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. महानाट्याच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ त्यांनी शहरात सुरु केली आहे. यामुळे समाजातील युवा पिढी, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक सर्वच एका व्यासपीठावर येऊ शकले आहेत. त्यांच्यातील नेतृत्व गुण पाहूनच काँग्रेसने त्यांना अल्पसंख्यांक काँग्रेस विभागाच्या शहराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. त्याचे ते सोन करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे.
सत्काराला उत्तर देताना चंद्रकांत उजागरे म्हणाले, आजही ख्रिश्चन समाज बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्याकडून समाजाला मोठ्या अपेक्षा आहेत. शहरात समाज बांधवांना अल्पसंख्यांक काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र करण्यासाठी मी काम करणार आहे. या माध्यमातून समाजाला न्याय देण्यासाठी मी कायम कटिबद्ध असेल.
रेव्ह. सनी मिसाळ, रेव्ह. सुनिल भांबळ यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी यावेळी सामूहिक प्रार्थना केली. पास्टर रेव्ह. पन्हाळकर यांनी धार्मिक संदेश दिला. ब्रदर स्तेफन गायकवाड यांनी उपकार स्तुतीचे विशेष गीत सादर केले. पुणे येथील गोस्पेल चर्चच्या क्वायर ग्रुपने विशेष भक्तिगीते सादर केली. बूथ हॉस्पिटलच्या क्वायर ग्रुपने ख्रिस्त जन्मावर आधारित समूह गीत सादर केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार साॅलोमन गायकवाड यांनी केले. यावेळी ख्रिश्चन समाज बांधवांना नाताळ सणाच्या शुभेच्छा उपस्थित मान्यवरांनी दिल्या.