आरोग्य व शिक्षण

कर्जत, जामखेड तालुक्याच्या आरोग्य विषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल – आरोग्य मंत्री राजेश टोपे

अहमदनगर दि. 2 (प्रतिनिधी) :- कर्जत जामखेड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विषयक सेवांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. कर्जत-जामखेड तालुक्‍याच्‍या आरोग्‍य विषयक सुविधांसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुक कल्‍याण मंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. कर्जत जामखेड येथे प्रत्येकी शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभात श्री. टोपे बोलत होते. या कार्यक्रम प्रसंगी कर्जत शहराच्‍या नगराध्यक्षा उषा राऊत, आमदार रोहित पवार, उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपविभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले, कार्यकारी अभियंता संजय पवार, गटविकास अधिकारी अमोल जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. खरपाडे, राजेंद्र फाळके, बाळासाहेब साळुंखे कर्जत नगरपंचायतीचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्‍य मंत्री श्री. टोपे म्‍हणाले, कर्जत जामखेड तालुक्‍याला प्रत्‍येकी 100 खाटांचे आणि मिरजगांव येथे 50 खाटांचे अत्‍याधुनिक उपजिल्‍हा रुग्‍णालये बांधण्‍यात येत असून या तीनही रुग्‍णालयांना उपजिल्‍हा रुग्‍णालयाचा दर्जा देण्‍यात आला. आता नव्‍याने बांधण्‍यात येणा-या रुग्‍णालयात नागरीकांना सर्व सुविधा उपलब्‍ध होणार असून त्‍यांना आता उपचारासाठी अहमदनगरला जाण्‍याची आवश्‍यकता भासणार नाही. कर्जत जामखेड या उपजिल्‍हा रुग्‍णालयात सर्व उपचार उपलब्‍ध करून देण्‍यात येतील. पुढच्‍या काळात सुध्‍दा या भागात विकासात्‍मक कामे हाती घेतली जातील असे त्‍यांनी सांगितले.
या भागातील लोकांना आरोग्‍यासाठी एक मोठा आधार मिळावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन ही रुग्‍णालये बांधण्‍यात येत आहे. सर्वांना खाजगी रुग्‍णालयात उपचार घेणे शक्‍य होत नाही, त्‍यासाठी हे रुग्‍णालये अत्‍याधुनिक स्‍वरुपातील रुग्‍णालये असणार आहे. रुग्‍णालयासाठी लागणा-या सर्व सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यात येतील. येत्‍या काळात राज्‍यातील 20 जिल्‍ह्यात शासकीय रुग्‍णालयामध्‍ये एन्‍जोग्राफी व एन्‍जोप्‍लास्‍टीची सुविधा लवकरच सुरू करण्‍यात येणार आहे. तसेच कर्करोगावर उपचारासाठी नव्‍याने 4 रुग्‍णालये राज्‍यात सुरू करण्‍यात येणार आहे. राज्‍यातील आरोग्‍यसेवा बळकट होण्‍यासाठी आरोग्‍य विभागात डॉक्‍टर्स, आरोग्‍य कर्मचा-यांची भरती करण्‍यात येईल. असे श्री. टोपे यावेळी म्‍हणाले.
आमदार रोहीत पवार आपल्‍या मनोगतात म्‍हणाले, शासनाच्‍या मदतीने 100 खाटांचे अत्‍याधुनिक रुग्‍णालय कर्जत व जामखेड येथे उभारण्‍यात येत आहे. या रुग्‍णालयाचा लाभ या भागातील व ग्रामीण भागातील जनतेला होईल. मतदार संघातील विकास कामे करतांना आरोग्‍यावर लक्ष केंद्रित केले असून चांगल्‍या आरोग्‍याबरोबरच चांगले शिक्षण हे सुध्‍दा महत्‍वाचे आहे. चांगले शिक्षण दिले तर चांगले नागरीक घडतील. त्‍याचा फायदा राज्‍याच्‍या व देशाच्‍या विकासासाठी होईल. कर्जत उपजिल्‍हा रुग्‍णालयासाठी 1 सिटीस्‍कॅन मशिन व 1 एम आर आय मशिन येत्‍या काही दिवसात उपलब्‍ध करुन मिळावे. अशी विनंती आमदार रोहित पवार यांनी आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांना केली. येथील रुग्‍णालयातील डॉक्‍टर्स व आरोग्‍य कर्मचा-यांसाठी कर्मचारी शासकीय निवासस्‍थाने वसाहत बांधण्‍यासाठी मंजूरी मिळाली असून पुढेही अशीच मदत आरोग्‍य मंत्र्यांकडून मिळेल अशी अपेक्षा त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍ती केली.
सुरूवातील आरोग्‍यमंत्री यांनी कर्जत रुग्‍णालयाची पाहणी करुन येथे आयोजित केलेल्‍या मोतीबिंदू शस्‍त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन केले. त्‍यानंतर त्‍यांनी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्‍पाची पाहणी केली. त्‍यानंतर त्‍यांच्‍या हस्‍ते नव्‍याने बांधण्‍यात येणा-या रुग्‍णालयाचे भुमिपुजन व कौनशिले अनावरण झाले. यावेळी कोविड काळात उल्‍लेखनीय काम केलेल्‍या कर्मचा-यांचा सत्‍कार, ऑक्सिजन सिलेंडर पुरवठा करणा-या वितरकांचा सत्‍कार आणि पत्रकार बांधवांचा सत्‍कार करण्‍यात आला. कार्यक्रमाच्‍या शेवटी कर्जत उपजिल्‍हा रुग्‍णालयाला कलर डॉपलर मशिन घेण्‍यासाठी 40 लाख रुपये निधीचा धनादेश आरोग्‍यमंत्री श्री. टोपे यांचे हस्‍ते रुग्‍णालयाच्‍या वैद्यकिय अधिकारी यांचेकडे सुपूर्द करण्‍यात आला. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक वैद्यकिय अधिक्षक डॉ. खरपाडे तर सुत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्‍टर्स, आरोग्‍य कर्मचारी आणि कर्जत शहरातील व परिसरातील नागरीक उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर दुपारी जामखेड येथील मंजूर झालेल्‍या 100 खाटांच्‍या उपजिल्‍हा रुग्‍णालयाचे भुमीपुजन व कौनशिला अनावरण आरोग्‍यमंत्री राजेश टोपे यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे