प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील वाटचाल ठरली विकसनशिल भारताच्या प्रगतीचा मार्ग :पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर दि. १६ डिसेंबर:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारची झालेली यशस्वी वाटचाल विकसनशिल भारताच्या प्रगतीचा मार्ग ठरला आहे. योजनांच्या माध्यमातून विविध क्षेत्रात झालेल्या क्रांतीकारी बदलांमुळेच भारत देश जगात नेतृत्व करण्यास सिध्द झाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
राहाता तालुक्यातील रांजणखोल येथे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री विखे पाटील यांनी सहभाग नोंदविला. या निमित्ताने आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या कार्डचे वितरण करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी पर्यावरण आणि सेंद्रीय शेतीवरील प्रबोधनात्मक कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी,प्रातांधिकारी किरण सावंत, जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ.नागरगोजे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, गटविकास आधिकारी जालिंदर पठारे, आरोग्य आधिकारी डॉ.घोलप, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.सुनिल तुंबारे, अंबादास ढोकचौळे, सरपंच सौ.शुभांगी ढौकचौरे, दत्तात्रय गोरे, सुभाष गायकवाड, चांगदेव ढौकचौळे, बाबासाहेब ढोकचौळे, आण्णासाहेब सदाफळ, सोमनाथ गोरे, नानासाहेब शिंदे, शरद नवले आदि याप्रसंगी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की, विकसीत भारताचे ध्येय साध्य करताना देशाच्या प्रगती बरोबरच समाजातील सामान्य माणूस हा विकास प्रक्रीयेचा घटक बनावा यासाठी केंद्र सरकारने शंभरहून अधिक योजना गावापर्यंत आणि लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रकारे जागर सुरु केला आहे. योजनेपासून वंचित राहीलेल्या घटकाला योजनेचा लाभ मिळावा हा उद्देश या संकल्प यात्रेचा असून या निमित्ताने आधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योग्य समन्वयाने जास्तीतजास्त गावांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वखाली केंद्र सरकारने नऊ वर्षात विद्यार्थ्यांपासून ते शेतक-यापर्यंत आणि छोट्या व्यवसायीकांपासून ते उद्योजकापर्यंत विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी केल्यानेच देशाची विकास प्रक्रीया वेगाने पुढे जात आहे. योजना सुरु झाली आणि बंद झाली असे एकही उदाहरण नाही असे स्पष्ट करुन केंद्र सरकारची यशस्वी वाटचाल हाच देशाच्या प्रगतीचा मार्ग बनला असल्याने आज जगाचे नेतृत्व करण्यासाठी आपला देश सिध्द झाला आहे. याकडे लक्ष वेधून एक विकसनशिल राष्ट्र म्हणून देशाची प्रतीमा निर्माण होत असतानाच देशाच्या आर्थिक विकासाचा पायाही मजबुत होत आहे. यामुळे आता देशात गुंतवणूक करण्यासाठी देश स्वत:हून पुढे येत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
शेती व्यवसायातही आता आधुनिकीकरण आणून यामध्ये महीला बचत गटांना संधी देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. यासाठी ड्रोनदीदी योजना केंद्र सरकारने सुरु केली असून, देशातील पंधरा हजार बचत गटांना ड्रोनचे वाटप करण्यात येणार असून, यासाठी केंद्र सरकारने एैशी टक्के अनुदान दिले आहे. शेती व्यवसायातील कष्ट वाचविताना बचत गटांनाच उत्पन्नाचे साधन निर्माण करुन देणारी योजना हा बदलत्या भारताचा परिणाम असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी आवर्जुन सांगितले.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्याक्षिकही दाखविण्यात
आले.