महसूल क्रीडा स्पर्धेत ‘प्रवरा पॅथर्स’ संघास विजेता चषक उपविजेता – नगरी टायगर्स व तृतीय विजेता- अहमदनगर रॉयल्स जिल्हाधिकाऱ्यांनी पटकावले टेबल टेनिस मध्ये सुवर्णपदक

शिर्डी,दि.१४ (प्रतिनिधी) – महसूल विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत प्रवरा पॅंथर्स संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. राहूरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मैदानावर १२ व १३ फेब्रुवारी २०२३ रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या.
राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी स्पर्धांचे उद्घाटन केले. अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू यु.डी.चव्हाण, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार आदी अधिकारी- महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांमध्ये प्रवरा पँथर्स (राहाता, कोपरगाव, संगमनेर, अकोले तालुका), अहमदनगर रॉयल्स (राहुरी, श्रीरामपुर, पाथर्डी, शेवगाव), नगरी टायगर्स ( जिल्हाधिकारी कार्यालय, नगर, नेवासा )साऊथ वॉरियर्स ( श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड) असे चार संघ सहभागी झाले होते.
क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, हॉलीबॉल, खो-खो, थ्रो बॉल , रिले धावणे या सांघिक प्रकारातील स्पर्धा तर बॅडमिंटन, टेबल टेनिस,कॅरम, लॉन टेनिस, पोहणे, धावणे उंच उडी,लांब उडी, भालाफेक, गोळा फेक थाळी फेक या वैयक्तिक प्रकारातील स्पर्धा या क्रीडा महोत्सवात घेण्यात आल्या. सांघिक व वैयक्तिक मधील पुरूष व महिला गटातील स्पर्धांमध्ये अव्वल स्थान राखत प्रवरा पॅंथर्स संघाने जिल्हा विजेता चषक पटकावला. नगरी टायगर्स संघ उपविजेता व अहमदनगर रॉयल्स तिसऱ्या स्थानी राहीला.
‘प्रवरा पॅंथर्स’ मध्ये संघ नायक म्हणून शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, संगमनेर प्रांताधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार कुंदन हिरे,अमोल निकम, विजय बोरूडे, सतीश थेटे यांचा विजेता चषक देऊन गौरव करण्यात आला.
विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले हे संगीत खुर्चीत विजेते ठरले तर टेबल टेनिस मध्ये त्यांनी सुवर्णपदक प्राप्त केले.
‘क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांमुळे अधिकारी – कर्मचाऱ्यांना प्रशासकीय ताण-तणावापासून सुटका मिळून वर्षभराच्या कामासाठी उर्जा मिळत असते” असे मत यावेळी जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी व्यक्त केले.